Yuvraj Singh cancer story
"मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटळ सत्य आहे; पण जेव्हा एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर असतो आणि अचानक त्याला समजतं की त्याच्याकडे केवळ ३ ते ६ महिन्यांचा काळ उरला आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. मृत्यूच्या भयापेक्षाही, येणारा प्रत्येक दिवस आपल्याला अंताकडे घेऊन जात आहे, हा विचार त्याचे मन पोखरून काढतो. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने हे जगणं प्रत्यक्ष अनुभवले होते. युवराजने मायकल वॉनच्या पॉडकास्टमध्ये कॉन्सरविरोधात आयुष्यातील सर्वात कठीण काळातील आठवणींना उजाळा दिला आहे.
२०११ च्या विश्वचषकादरम्यान युवराज कर्करोगाशी झुंजत होता, परंतु वेदना सहन करत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वचषक संपल्यानंतर मात्र त्याची तब्येत खालावली. याबद्दल सांगताना युवराज म्हणाला, "हे स्वीकारणे खूप कठीण होते. तुम्ही यशाच्या शिखरावर असता आणि अचानक दरीत कोसळता. मी तेव्हा दिल्लीत होतो. सौरव गांगुली निवृत्त झाला होता आणि कसोटी संघात माझी जागा निश्चित झाली होती. ज्या संधीसाठी मी सात वर्षे वाट पाहिली, ती अखेर मिळाली होती. मी डॉक्टरांना म्हणालो होतो की, माझा मृत्यू झाला तरी चालेल पण मला खेळायचे आहे."
युवराजने मायकल वॉनसोबतच्या संवादात सांगितले की, "डॉ. नितेश रोहतगी यांनी मला स्पष्ट शब्दांत बजावले होते की, ट्युमर तुमच्या हृदय आणि फुफ्फुसांच्या दरम्यान आहे. तुम्ही केमोथेरपी घेतली नाही, तर तुमच्याकडे केवळ ३ ते ६ महिने उरले आहेत; एकतर तुम्ही क्रिकेट खेळा किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येईल. त्यानंतरच मला परिस्थितीचे गांभीर्य उमजले."
उपचारांसाठी युवराज अमेरिकेला गेला. तिथे प्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगवर उपचार करणाऱ्या डॉ. आइनहॉर्न यांनी त्याच्यावर उपचार केले. "मी पुन्हा कधीच खेळू शकणार नाही, हे सत्य पचवायला मला एक वर्ष लागले. मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. क्रिकेट नसेल तर मी कोण? हा प्रश्न मला सतावत होता," असे युवराजने नमूद केले.
आजाराच्या काळात अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर यांनी युवराजची भेट घेऊन त्याला धीर दिला. युवराज सांगतो, "अनिल कुंबळे अमेरिकेला आले होते, त्यांनी माझा लॅपटॉप बंद केला. त्यांनी मला सांगितले की आधी प्रकृतीकडे लक्ष दे. डॉ. आइनहॉर्न यांनी मला आत्मविश्वास दिला की, तू इथून कर्करोगमुक्त होऊनच बाहेर पडशील."
कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतर युवराजने सहा महिन्यांतच भारतीय संघात पुनरागमन केले आणि टी-२० विश्वचषकात 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारही पटकावला. झहीर खानसोबत फ्रान्समध्ये घेतलेले विशेष प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर युवराजने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला होता.