Yashveer Gaud Pakistan U19 Asia Cup controversy  File Photo
स्पोर्ट्स

U19 Asia Cup controversy : "पाकिस्‍तानच्‍या खेळाडूंनी दिवाळीच्या दिवशी आम्‍हाला शिवीगाळ केली..." : यशवीर गौडचा मोठा खुलासा

U19 Asia Cup controversy : आशिया चषक स्‍पर्धेतील अंतिम सामन्‍यात भारतीय खेळाडूंच्‍या आक्रमक सेलिब्रेशनचेही कारण केले स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

Yashveer Gaud Pakistan U19 Asia Cup controversy : "आम्ही पाकिस्‍तानविरुद्‍ध दिवाळीच्या दिवशी सामना हरलो होतो. तेव्हा आमच्यात काही शाब्दिक चकमक झाली होती. यावेळी पाकिस्‍तानच्‍या खेळाडूंनी शिवीगाळ केली. सामना हरल्यानंतर आम्ही काहीही बोलू शकलो नव्हतो. आम्ही अंतिम सामन्याची वाट पाहत होतो. आम्हाला चांगली कामगिरी करून भारत काय करू शकतो, हे दाखवून द्यायचे होते," अशा शब्‍दांमध्‍ये भारत १९ वर्षांखालील (U19) क्रिकेट संघाचा खेळाडू यशवीर गौड याने अंतिम सामना जिंकल्‍यानंतर भारतीय खेळाडूंनी केलेल्‍या अत्‍यंत आक्रमक सेलिब्रेशनचे कारण स्‍पष्‍ट केले.

पाकिस्तानच्या वर्तनाला मैदानावरच उत्तर देण्याचा निर्धार

'स्पोर्ट्स टुडे'शी बोलताना यशवीर गौड म्‍हणाला की, "पाकिस्तानच्या चिथावणीखोर वर्तनाला मैदानावरच उत्तर देण्याचा निर्धार हाच त्यांच्या 'यु-१९ आशिया कप' विजयानंतरच्या जल्लोषामागचे मुख्य कारण होता. साखळी फेरीत दिवाळीच्या दिवशी भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु अंतिम सामन्यात पुन्हा आमनेसामने आल्यावर भारताला परिस्थिती बदलण्याची आम्‍हाला सुवर्णसंधी मिळाली."

साखळी फेरीत भारताचा झाला होता पराभव

१९ वर्षांखालील (U19) आशिया चषक क्रिकेट स्‍पर्धेतील साखळी फेरीत पाकिस्‍तानने भारताचा तीन गडी राखून पराभव केला होता. अर्जुन राजपूतच्या शतकाच्या जोरावर भारताने २०८ धावा केल्या होत्या; परंतु हमझा झुरूरच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले.

सामन्‍यादरम्‍यान दोन्‍ही संघांमधील खेळाडूमध्‍ये शाब्दिक चकमक

यशवीर म्हणाला, या पराभवामुळे भारतीय खेळाडू निराश झाले होते, विशेषतः सामन्यादरम्यान दोन्ही संघांमधील शाब्दिक चकमक आणि शिवीगाळ झाल्‍याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली होती.मात्र, भारताने आपले उत्तर अंतिम सामन्यासाठी राखून ठेवले होते.

त्‍यांच्‍याच भाषेत उत्तर दिले

सामना संपल्यानंतर जल्लोष करणाऱ्या खेळाडूंमध्ये यशवीर आघाडीवर होता. प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या जल्लोषाबद्दल आणि त्यावरून उमटलेल्या विविध प्रतिक्रियांबाबत बोलताना तो म्हणाला की, भारतीय खेळाडू केवळ त्यांना आधी आलेल्या अनुभवाचे उत्तर देत होते. आम्ही तेच करत होतो जे त्यांनी आधी केले होते. ते शांत होते, आम्हीही शांत होतो. आम्ही भारताची जर्सी घातली होती. आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. प्रत्येकजण भावूक झाला होता."

मोहित उल्वाच्‍या चौकाराने भारताला केली अविस्‍मरणीय विजयाची नोंद

१४ नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानचा एका गडी राखून पराभव केला. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारत २५२/८ अशा कठीण परिस्थितीत सापडला होता, परंतु मानल चौहान (४७) आणि मोहित उल्वा (४९ नाबाद) यांनी डाव सावरला. शेवटच्या चेंडूवर मोहित उल्वाने विजयी चौकार मारून एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.भारताचा हा विजय एका प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाला आहे. भारताने २०२१ मध्ये १९ वर्षांखालील आशिया चषक जिंकला होता. त्यानंतर २०२३ मध्ये उपांत्य फेरीत बांगलादेशकडून पराभव पत्करल्यामुळे भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर २०२४ च्या अंतिम सामन्यात बांगलादेशकडून ५९ धावांनी, तर २०२५ च्या अंतिम लढतीत पाकिस्तानकडून १९१ धावांनी भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.अखेर २०२६ मध्ये, पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या एका विकेटच्या थरारक विजयासह भारताने पुन्हा एकदा १९ वर्षांखालील आशिया चषकावर आपले नाव कोरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT