Yashasvi Jaiswal Run Out Controversy: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी आजपासून (१५ ऑगस्ट) सुरू होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरूवात केली. आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला यशस्वी आजही चांगल्या टचमध्ये दिसत होता. मात्र ३७ चेंडू ३२ धावांची खेळी केल्यानंतर तो दुर्दैवी ठरला. तो विचित्र प्रकारे धावबाद झाला.
दहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर केएल राहुल स्ट्राईकवर होता. केशरा नुवांथाच्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या उद्येशाने राहुलने चेंडू मीड ऑनच्या दिशेने पुश केला. मात्र नुवांथाने डाईव्ह मारून तो अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या यशस्वीच्या पायावरच जाऊन पडला. यशस्वी त्यामुळं अडखळला. तोपर्यंत स्ट्राईकवर असलेला केएल राहुल धाव घेण्याच्या उद्देशाने धावला अन् नॉन स्ट्राईकवर पोहचला देखील. मात्र अडखळलेल्या यशस्वीची गाडी तिथेच अडकली. आता आपण धावबाद होणार असं जाणवल्यावर तो तिथंच स्तब्ध अन् हताश उभा राहिला.
आता इथं चूक कोणाची याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र श्रीलंकेच्या विकेटकिपरने लगेच बेल्स उडवलेली नाही. त्याने थोडा वेळा वाट पाहिली अन् त्यानंतर त्याने बेल्स उडवली. इथं यशस्वी जास्त गोंधळला. आधी पुढे गेला नंतर तो मागे फिरला. तेवढ्यात केएल राहुल नॉन स्ट्राईक एन्डला पोहचला होता. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंवर अखिलाडूवृत्तीचा ठपका ठेवता येणार नाही. इथं भारतीय फलंदाजच जास्त गोंधळल्याचं दिसतं.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलने केएल राहुलला चांगली साथ देत भारताला २७ व्या षटकात शतकी मजल मारून दिली. केएल राहुल सावध खेळत असून पडिक्कल चांगल्या गतीने धावा करताना दिसत आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गिलने आपल्या प्लेईंग ११ मध्ये दोन फिरकीपटू, एक फिरकी अष्टपैलू आणि दोन वेगवान गोलंदाजांचे कॉम्बिनेशन ठेवले आहे.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेला, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा