Yashasvi Jaiswal NADA Notice Pudhari
स्पोर्ट्स

NADA Notice: यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्मा अडचणीत; NADA कडून नोटीस; खेळाडूंवर बंदी घातली जाणार?

Yashasvi Jaiswal NADA Notice: यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्मा यांना NADA ने ‘वेयरअबाउट्स फेल्योर’ नियमांतर्गत नोटीस बजावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Yashasvi Jaiswal NADA Notice: भारतीय क्रिकेटमधील दोन युवा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्मा यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था म्हणजेच NADA (National Anti-Doping Agency) ने दोघांनाही नोटीस बजावली आहे. ‘वेयरअबाउट्स फेल्योर’ (Whereabouts Failure) नियमाचे पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोपिंगविरोधी नियमांनुसार, RTP (Registered Testing Pool) मध्ये असलेल्या खेळाडूंना ठराविक वेळेत आपण कुठे असणार आहोत, याची माहिती NADA ला आधीच द्यावी लागते. यामुळे डोपिंग कंट्रोल अधिकारी (DCO) अचानक तपासणीसाठी येऊ शकतात.

मात्र, माहितीनुसार, यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्मा हे दोघेही ठरलेल्या वेळेस आणि ठिकाणी तपासणीसाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे NADA ने त्यांच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

यशस्वी जायसवालचा डोप टेस्ट १७ डिसेंबर रोजी होणार होता, तर शेफाली वर्माचा टेस्ट ७ नोव्हेंबरला निश्चित करण्यात आला होता. मात्र DCO अधिकारी दिलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर दोघेही तेथे आढळले नाहीत.

यानंतर NADA ने फेब्रुवारीमध्ये दोन्ही खेळाडूंना स्पष्टीकरण मागणारी नोटीस पाठवली. यशस्वीकडून १८ फेब्रुवारीपर्यंत आणि शेफालीकडून २० फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागवण्यात आले होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, वेळेत उत्तर न मिळाल्याने एजन्सीने दोघांविरोधात पहिला ‘मिस्ड टेस्ट’ नोंदवला आहे.

दोघांवर बंदी येणार का?

सध्या तरी हे प्रकरण थेट डोपिंग उल्लंघनाच्या श्रेणीत येत नाही. नियमांनुसार, एखादा खेळाडू १२ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा ‘वेयरअबाउट्स फेल्योर’चा दोषी आढळल्यास त्याच्यावर अँटी-डोपिंग नियमभंगाची कारवाई होऊ शकते.

अशा परिस्थितीत खेळाडू स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांच्यावर दोन वर्षांपर्यंत बंदी घालण्याची शक्यता असते. मात्र सध्या यशस्वी आणि शेफाली यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेला उधाण

या प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अँटी-डोपिंग नियमांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कारण यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्मा हे भारतीय क्रिकेटचे भविष्यातील मोठे स्टार मानले जातात.

सध्या यशस्वी जायसवाल राजस्थान रॉयल्स कडून आयपीएल २०२६ मध्ये खेळत आहे. तर शेफाली वर्माने महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT