yahasvi jaiswal wtc record indian left hand batsman hit 6th century
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सध्या दिल्ली येथे सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, संघासाठी यशस्वी जैस्वालने जबरदस्त खेळ दाखवला. त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना अक्षरशः निष्प्रभ करत दमदार शतक झळकावले. केएल राहुल बाद झाल्यानंतर त्याला साई सुदर्शनने उत्तम साथ दिली.
यशस्वी जैस्वालने आतापर्यंत भारतीय संघासाठी केवळ तिस-या सत्रात चेंडूंमध्ये १५० धावा पूर्ण केल्या, ज्यात १९ चौकारांचा समावेश होता. तो अजूनही खेळपट्टीवर स्थिर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच संयमित फलंदाजी केली आणि विंडिजच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. त्याच्यामुळेच भारतीय संघाने टी ब्रेकपर्यंत अवघ्या एका गड्याच्या नुकसानीवर २२० धावांचा टप्पा पार केला आहे.
सलामी फलंदाज म्हणून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील (WTC) यशस्वी जैस्वालचे हे सहावे शतक आहे. यासह, WTC मध्ये सलामी फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने दिमुथ करुणारत्ने आणि उस्मान ख्वाजा यांची बरोबरी साधली आहे. या दोन्ही खेळाडूंनीही WTC मध्ये सलामीवीर म्हणून प्रत्येकी ६ शतके नोंदवली आहेत. WTC मध्ये सलामी फलंदाज म्हणून जैस्वालपेक्षा जास्त शतके केवळ रोहित शर्माच्या नावावर आहेत. त्याने WTC मध्ये एकूण ९ शतके झळकावली आहेत.
रोहित शर्मा (भारत) : ९ शतके
यशस्वी जैस्वाल (भारत) : ६ शतके
दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) : ६ शतके
उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) : ६ शतके
अब्दुल्ला शफीक (पाकिस्तान) : ५ शतके
केएल राहुल (भारत) : ५ शतके
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : ५ शतके