स्पोर्ट्स

WTC Points Table : श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकूनही भारताचे नुकसान; WTC फायनलचा मार्ग खडतर

IND vs SL Test : भारताने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले, अजून ७ सामने शिल्लक

रणजित गायकवाड

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो येथे खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. हा सामना अनिर्णित सुटला असला, तरी भारतीय संघाने ही दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशा फरकाने आपल्या नावावर केली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका विजय नक्कीच नोंदवला, परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC २०२५-२७) गुणतालिकेत भारतीय संघाला याचा विशेष फायदा झालेला नाही. मालिका विजयानंतरही भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावरच कायम आहे.

या मालिकेपूर्वीही भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर विराजमान होता. दुसऱ्या सामन्यातील अनिर्णित निकालामुळे भारताच्या विजयाच्या टक्केवारीत (PCT) किंचित घसरण झाली असून ती आता ५१.५२ टक्क्यांवर आली आहे. जर भारताने ही मालिका २-० ने जिंकली असती, तर गुणतालिकेतील गुणांच्या टक्केवारीत मोठी झेप घेता आली असती; परंतु सामना अनिर्णित राहिल्यामुळे भारताला ती संधी गमवावी लागली. दुसरीकडे, यजमान श्रीलंका संघ ३३.३३ गुणांच्या टक्केवारीसह भारताच्या लगतच म्हणजेच सहाव्या स्थानावर कायम आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ या चक्रात भारताने आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत. यांपैकी ५ सामन्यांमध्ये भारताने विजय संपादन केला असून ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. या स्थितीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उर्वरित सामन्यांत अतिशय चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

या चालू चक्रात भारताला आणखी ७ कसोटी सामने खेळायचे असून, टीम इंडियाच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत आव्हानात्मक आणि कसोटी पाहणारी ठरणार आहे. दरम्यान, गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ ८०.०० टक्केवारीसह अव्वल स्थानी असून, दक्षिण आफ्रिकेचा संघ ७५.०० गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर भक्कम स्थितीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT