भारत टॉप ५ मधूनही बाहेर फेकला गेला
न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानावर झेप
पाकिस्तान भारताच्या वर
WTC 2025-27 Points Table: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याकडे फक्त त्या दोन देशातील क्रिकेट चाहत्यांचे नाही तर भारतातील चाहत्यांचेही लक्ष लागून राहिले होते. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजचा ९ विकेट्स राखून पराभव केला.
न्यूझीलंडच्या या विजयानंतर त्यांनी WTC पॉईंट टेबलमध्ये मोठी मजल मारली आहे. न्यूझीलंड या एका विजयामुळं थेट तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. मात्र न्यूझीलंडच्या या विजयाचा अन् विंडीजच्या पराभवाचा मोठा फटका भारताला बसलाय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघ आता टॉप ५ मधून बाहेर फेकला गेला आहे. भारताने मायदेशातील दक्षिण अफ्रिकेविरूद्धची २ कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी गमावली होती.
भारत आता WTC 2025-27 मध्ये अजून तीन कसोटी मालिका खेळणार आहे. भारत न्यूझीलंड. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासोबत कसोटी मालिका खेळणार आहे.
न्यूझीलंड - वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या कसोटीबाबत बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या विजयामुळं त्यांच्या खात्यातील गुण हे ६६.६७ टक्के झाले आहे. ते सध्या तिसऱ्या स्थानावर असून दोन वेळची फायनलिस्ट ऑस्ट्रेलिया १०० टक्के विनिंग पर्सेंटेज घेऊन पहिल्या स्थानावर आहे. तर भारताला व्हाईट वॉश देणारी दक्षिण अफ्रिका ही ७५ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारताबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यात भारताला फक्त ४ सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांचे गुण हे ४८.१५ टक्के आहेत. भारत सध्या WTC पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान ५० टक्के अंकांसह भारताच्या वर ५ व्या स्थानावर आहे.