स्पोर्ट्स

WPL Final : जिवलग मैत्रिणींमध्ये झुंज..! स्मृती-जेमिमाच्या RCB-DC मध्ये जेतेपदाचा 'महामुकाबला', कोण बाजी मारणार?

'चौथी' संधी साधून दिल्लीचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार

रणजित गायकवाड

WPL Final RCB vs DC Battle Smriti Mandhana vs Jemimah Rodrigues

वडोदरा : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2026) चौथ्या हंगामाचा थरार आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गुरुवारी, ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर विजेतेपदासाठी दोन दिग्गज संघ भिडणार आहेत. एकीकडे गुणांच्या तालिकेत अव्वल स्थान पटकावून थेट फायनलमध्ये धडक मारलेला स्मृती मंधानाचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघ आहे, तर दुसरीकडे एलिमिनेटरमध्ये गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणारा जेमिमा रॉड्रिग्सचा दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ सज्ज झाला आहे.

दिल्लीचा 'फायनल' प्रवास आणि विजेतेपदाचा निर्धार

दिल्ली कॅपिटल्ससाठी ही फायनल अस्तित्वाची लढाई आहे. लीगच्या पहिल्या हंगामापासून दिल्लीने प्रत्येक वेळी अंतिम फेरी गाठली आहे, पण दुर्दैवाने त्यांना अद्याप चषकावर नाव कोरता आलेले नाही. यंदा एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सने दिलेले १६९ धावांचे आव्हान दिल्लीने अवघ्या १७.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. शफाली वर्मा आणि लिजेल ली यांच्या ८९ धावांच्या धडाकेबाज सलामीने सामन्याचा निकाल सुरुवातीलाच स्पष्ट केला होता. आता चषकाची 'चौथी' संधी साधून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा दिल्लीचा निर्धार असेल.

बेंगळुरूचा 'किंग' फॉर्म

दुसरीकडे, दुसऱ्या हंगामातील विजेत्या आरसीबीने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ८ पैकी ६ सामने जिंकत त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. विशेष म्हणजे, २०२४ च्या अंतिम सामन्यात बेंगळुरूने दिल्लीचाच पराभव करून जेतेपद मिळवले होते. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी स्मृती मानधनाची पलटण सज्ज आहे. ग्रेस हॅरिस, ऋचा घोष आणि श्रेयंका पाटील यांसारख्या मॅचविनर खेळाडूंमुळे आरसीबीचे पारडे जड मानले जात आहे.

कधी आणि कुठे रंगणार हा थरार?

क्रिकेटप्रेमींना हा 'हाय-व्होल्टेज' सामना विविध प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

  • तारीख : गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६

  • स्थळ : बीसीए स्टेडियम, कोताम्बी (वडोदरा)

  • वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता (टॉस संध्याकाळी ७:०० वाजता)

  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (टीव्ही)

  • लाईव्ह स्ट्रीमिंग : जिओ हॉटस्टार (अ‍ॅप आणि वेबसाईट)

कोणाचे पारडे जड?

आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्सचे वर्चस्व दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ९ लढतींपैकी दिल्लीने ६ तर बेंगळुरूने ३ सामने जिंकले आहेत. या हंगामातही दिल्लीने आरसीबीचा विजयी रथ रोखला होता. मात्र, फायनलच्या दबावात आरसीबीचा संघ कमालीची कामगिरी करतो, हे त्यांनी २०२४ मध्ये दाखवून दिले आहे.

संभाव्य प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वोल, ऋचा घोष, राधा यादव, नदीन डी क्लर्क, पूजा वस्त्राकार, अरुंधति रेड्डी, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल, सयाली सतघरे.

दिल्ली कॅपिटल्स : जेमिमा रोड्रिग्स (कर्णधार), शफाली वर्मा, लिजेल ली, लौरा वोलवार्ड, निकी प्रसाद, मरिज़नने कप्प, चिनले हेनरी, स्नेह राणा, नल्लापुरेड्डी चराणी, मिन्नू मनी, नंदनी शर्मा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT