स्पोर्ट्स

9.25 कोटी खर्च! मुंबई इंडियन्सने WPL 2026 साठी 'या' 5 खेळाडूंवर ठेवला विश्वास, ऑक्शनपूर्वी जाहीर केली 'रिटेंशन लिस्ट'

WPL 2026 Mumbai Indians retention : महिला प्रीमियर लीग 2026 साठी 27 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

रणजित गायकवाड

WPL 2026 Auction Mumbai Indians Retained Players

महिला प्रीमियर लीग 2026 साठी 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीत मेगा ऑक्शन (महा लिलाव) होणार आहे. त्यापूर्वीच, मुंबई इंडियंसने आपल्या 'रिटेंशन लिस्ट'ची घोषणा केली आहे. आगामी हंगामासाठी मुंबई फ्रँचायझीने कर्णधार हरमनप्रीत कौरसह एकूण 5 खेळाडूंना कायम ठेवले आहे.

महिला प्रीमियर लीग 2026 साठी 27 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या महालिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी आपापल्या रिटेंशन लिस्ट्स (कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी) जाहीर केल्या आहेत. दोनदा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियंस (MI) संघानेही आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. एमआयने कर्णधार हरमनप्रीत कौरसह 5 खेळाडूंना कायम ठेवले आहे. उल्लेखनीय आहे की, मुंबई संघाने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून WPL 2025 चे विजेतेपद जिंकले होते.

मुंबई इंडियंसने ‘या’ 5 खेळाडूंना केले कायम

मुंबई इंडियंसने WPL 2026 हंगामासाठी 5 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयने कर्णधार हरमनप्रीत कौर (2.5 कोटी), विदेशी स्टार नॅट सायव्हर-ब्रंट (3.5 कोटी), हेली मॅथ्यूज (1.75 कोटी), अष्टपैलू अमनजोत कौर (1 कोटी) आणि अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेली) खेळाडू जी कमलिनी (50 लाख) यांना संघात कायम ठेवले आहे. हे पाचही खेळाडू WPL 2026 मध्ये मुंबई इंडियंसकडून खेळताना दिसतील.

WPL रिटेंशनचे नियम आणि 'राइट टू मॅच'चा पर्याय

WPL च्या नियमांनुसार, प्रत्येक संघ जास्तीत जास्त तीन कॅप्ड (आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले) भारतीय खेळाडू, दोन विदेशी खेळाडू आणि दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना रिटेन करू शकतो. तथापि, जर एखाद्या फ्रँचायझीला सर्वच्या सर्व 5 खेळाडूंना कायम ठेवायचे असेल, तर त्यापैकी कमीतकमी एक अनकॅप्ड भारतीय खेळाडू असणे अनिवार्य आहे.

याव्यतिरिक्त, WPL 2026 मध्ये राईट टू मॅच (RTM) हा पर्याय देखील समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे फ्रँचायझींना लिलावादरम्यान आपल्या कोणत्याही जुन्या खेळाडूला पुन्हा खरेदी करण्याची संधी मिळेल. परंतु, मुंबईने 5 खेळाडूंना रिटेन केल्यामुळे, फ्रँचायझीकडे 'राईट टू मॅच'चा पर्याय उपलब्ध नसेल.

मुंबई इंडियंसकडे लिलावासाठी 'इतके' पर्स शिल्लक

WPL ने लिलावासाठी एकूण पर्स (खर्च करण्याची रक्कम) 15 कोटी रुपये निश्चित केली आहे आणि खेळाडूंना रिटेन करण्यासाठी विविध वेतन स्लॅब ठरवले आहेत.

  • खेळाडू 1 साठी 3.5 कोटी रुपये

  • खेळाडू 2 साठी 2.5 कोटी रुपये

  • खेळाडू 3 साठी 1.75 कोटी रुपये

  • खेळाडू 4 साठी 1 कोटी रुपये

  • पाचव्या खेळाडूला कायम ठेवण्यासाठी 50 लाख रुपये

जर एखादा संघ 5 खेळाडूंना रिटेन करत असेल, तर त्यांच्या 15 कोटींच्या पर्समधून एकूण 9.25 कोटी रुपये वजा केले जातात.

चार रिटेन केलेल्या खेळाडूंसाठी ही कपात 8.75 कोटी रुपये, तीनसाठी 7.75 कोटी रुपये, दोनसाठी 6 कोटी रुपये आणि एकासाठी 3.5 कोटी रुपये असेल. त्यामुळे, मुंबई इंडियंसकडे आता लिलावासाठी केवळ 5.75 कोटी रुपये पर्स शिल्लक आहेत.

मुंबई इंडियंसच्या कायम केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी

  • हरमनप्रीत कौर : 2.5 कोटी रुपये

  • नॅट सायव्हर-ब्रंट : 3.5 कोटी रुपये

  • अमनजोत कौर : 1.0 कोटी रुपये

  • हेली मॅथ्यूज : 1.75 कोटी रुपये

  • जी. कमलिनी : 50 लाख रुपये

एकूण खर्च 9.25 कोटी रुपये

शिल्लक पर्स : 5.75 कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT