Who is Temba Bavuma Cricket News in Marathi
मुंबई : दाटीवाटीच्या वस्तीत एक मजली घरात जन्म, पाण्यासाठी सार्वजनिक नळाचा आधार, स्वच्छतागृहदेखील घराबाहेरच... अशा परिस्थितीत वाढलेला एक कृष्णवर्णीय मुलगा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात पोहोचतो, आफ्रिकेकडून खेळताना 127 वर्षांनी कसोटीत शतक ठोकणारा पहिला कृष्णवर्णीय फलंदाज ठरतो आणि आता बड्या स्पर्धांमध्ये चोकर्स असा शिक्का बसलेल्या संघाला आयसीसीचे पहिले वहिले चषक जिंकवून देतो.. ज्याची सोशल मीडियावर उंचीवरून खिल्ली उडवली जाते तोच खेळाडू दुखापतीने ग्रासले असतानाही मैदानात टिच्चून फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघातील ‘दादा’ गोलंदाजांना घाम फोडतो आणि सोशल मीडियावर हिरो ठरतो.. या खेळाडूचं नाव आहे टेम्बा बवूमा.
टेम्बा बवूमाचा जन्म
आफ्रिकेच्या केप प्रदेशातील केप टाऊनमध्ये 17 मे 1990 रोजी टेम्बा बवूमाचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. ज्या भागात राहत होता तिथे दाटीवाटीने घर होतं. याच भागतल्या रस्त्यावर (ज्याला आपण गल्ली क्रिकेट म्हणतो) टेम्बा क्रिकेट खेळू लागला. टेम्बाचे पहिल्या कोचनी सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राला सांगितले होते की, टेम्बा तीन वर्षांचा असेल जेव्हा तो क्रिकेट खेळू लागला. लाकडी फळी आणि टेनिस बॉलने तो क्रिकेट खेळायचा. आधीपासूनच त्याला फलंदाजी आवडायची. हळूहळू तो अंडर 10, अंडर 13 संघात खेळू लागला.
टेम्बाचे वडील हे केप टाऊननमध्ये पत्रकार होते. वडिलांना ‘दी स्टार’मध्ये नोकरी लागल्यावर तो वडिलांसोबत जोहान्सबर्गमध्ये पोहोचला. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने क्रिकेटमधील शिष्यवृत्तीही मिळवली. 18 व्या वर्षी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2012- 13 च्या हंगामात दक्षिण आफ्रिका अ संघातून खेळताना तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी होता. 2014 मध्ये वेस्ट इंडिज मालिकेसाठी त्याची कसोटी संघात वर्णी लागली.
दिग्गजांच्या निवृत्तीचा काळ
बवूमाची संघात निवड झाली तेव्हा दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहत होते. संघातील दिग्गज खेळाडू निवृत्ती स्वीकारत होते. वेस्ट इंडिजला नमवलं तरी त्यानंतरच्या भारत दौऱ्यात संघाचा दारूण पराभव झाला. याच काळात बवूमा तीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला. हाशिम आमला, एबी डिव्हिलियर्स आणि फाफ टू प्लेसिस या कर्णधारांच्या तालमीत तो घडत होता. पण दुसरीकडे आफ्रिकेचं आयसीसी क्रमवारीतील स्थान घसरत होतं.
कारकिर्दीची सुरूवात निराशाजनक
पहिल्या आठ वर्षात बवूमाला कसोटीत 20 अर्धशतकच ठोकता आली. 2016 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीतील पहिले शतक ठोकले. 1889 नंतर कसोटीत शतक ठोकणारा तो पहिला कृष्णवर्णीय फलंदाज ठरला. अवघ्या 5 फूट 3 इंच इतकी उंची असलेला फलंदाज जागतिक स्तरावरील उंचपुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर कसा टिकणार असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक. पण बवूमा हा संयमी होता. फलंदाजी आणि फिटनेस यावर तो काम करत होता.
2021- 24 या कालावधीत दुखापतीमुळे जवळपास 10 कसोटी सामन्यांना तो मुकला. अगदी दोन वर्षांपूर्वी वन डे संघातील त्याचे स्थान डळमळीत होते. जानेवारी 2022 नंतर त्याने शतक ठोकले ते जानेवारी 2023 मध्ये. कालावधीत तो 33 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये मैदानात उतरला. चार अर्धशतक, 15 वेळा एकेरी धावा आणि दोन वेळा शून्य धावा करून तो माघारी फिरला. ‘कारकिर्दीत चढउतार येतात. भावनिकदृष्ट्या तुमचे खच्चीकरण होऊ शकते. खेळाडू म्हटला की प्रत्येकाच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे असतात. तुम्हाला शांतपणे खेळ सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागते’, असं त्याने एका मुलाखतीत सांगितले.
बवूमाच्या पाठिशी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डही उभा राहिला. महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी त्याला विश्रांती दिली जायचे. याचा फायदाही त्याला झाला. ‘माझी शरीरयष्टी बघून तुम्हाला फिटनेसवर शंका येईल. पण दोन आठवड्याची विश्रांती ही माझ्यासाठी महत्त्वाची असते. कुटुंबासाठी वेळ देता येतो, स्वत:साठी वेळ मिळतो आणि याचा फायदा म्हणजे मैदानात उतरल्यावर टीमकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो’, असं तो सांगतो.
लढवय्या कर्णधार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फलंदाजीदरम्यान बवूमाच्या पायाला दुखापत झाली. अक्षरश: लंगडत लंगडत तो पळत होता. अशा कठीण परिस्थितीतही तो टिच्चून फलंदाजी करत होता. 66 धावांची खणखणीत खेळी करत त्याने नेतृत्व कसं करावं हेच दाखवून दिले. ‘माझ्या क्रिकेट कारकिर्दीला दशकभरापेक्षा जास्त कालावधी झालाय. एकच गोष्ट बदलली नाही ती म्हणजे माझे क्रिकेटवरील प्रेम आणि खेळण्याची जिद्द कायम आहे’ असं बवूमाने मध्यंतरी सांगितलं होतं. कदाचित हेच त्याच्या यशाचं कारण असेल.