अर्जेटीनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या भारत दौऱ्याला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मेस्सी भारतात येणार असून, २०११ नंतरचा हा त्याचा दुसरा भारत दौरा ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विराट कोहली यांच्यासह अनेक क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची भेट घेण्याची शक्यता आहे.
जगज्जेत्या मेस्सीच्या तीन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात १२ डिसेंबर रोजी कोलकाता येथून होईल. याबाबतची माहिती सताद्रू दत्ता यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले की, ‘मेस्सीच्या 'जीओएटी टूर ऑफ इंडिया २०२५' (GOAT Tour of India 2025) या दौऱ्याचा पहिला टप्पा कोलकाता असेल. त्यानंतर तो अहमदाबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांना भेट देईल. या दौऱ्याची सांगता १५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या भेटीने होईल. याव्यतिरिक्त, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्याशीही मेस्सीच्या भेटीचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.’
२०११ साली सॉल्ट लेक स्टेडियमवर फिफाचा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी मेस्सी भारतात आला होता. त्यानंतरचा हा त्याचा पहिलाच भारत दौरा आहे. दत्ता यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ‘मला दौऱ्याविषयी निश्चित माहिती मिळाली आहे आणि त्यानंतरच मी याची घोषणा (सोशल मीडियावर) केली आहे. मेस्सी स्वतः २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान या दौऱ्याची अधिकृत घोषणा करू शकतो, ज्यात अधिकृत पोस्टर आणि दौऱ्याची सविस्तर माहिती असेल.’
या वर्षाच्या सुरुवातीला दत्ता यांनी मेस्सीच्या वडिलांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. त्यानंतर मेस्सीने स्वतः दत्ता यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन तब्बल ४५ मिनिटे चर्चा केली होती. दत्ता म्हणाले की, ‘मी मेस्सीला संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि त्याला भारत दौरा करण्याचे निमंत्रण दिले होते,’ असे त्यांनी सांगितले.
मेस्सीसोबत इंटर मियामी क्लबचे त्याचे सहकारी रॉड्रिगो डी पॉल, लुई सुआरेझ, जॉर्डी अल्बा आणि सर्जिओ बुस्केट्स हेदेखील भारतात येऊ शकतात. प्रत्येक शहरात मेस्सी लहान मुलांसाठी आयोजित ‘मास्टरक्लास’मध्ये सहभागी होऊन त्यांना फुटबॉलचे धडे देईल.
मेस्सी १२ डिसेंबर रोजी कोलकात्यात दाखल होईल. तेथे त्याच्या दोन दिवस व एक रात्र मुक्काम असेल. १३ डिसेंबर रोजी तो 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधणार आहे. त्याच्यासाठी एका विशेष 'फूड अँड टी फेस्टिव्हल'चे आयोजन केले जाईल, जिथे त्याला बंगाली हिल्सा मासा, पारंपरिक बंगाली मिठाई आणि आसाम चहाचा आस्वाद घेता येईल. यानंतर ईडन गार्डन्स किंवा सॉल्ट लेक स्टेडियमवर 'जीओएटी कॉन्सर्ट' आणि 'जीओएटी कप'चे आयोजन करण्यात येईल.
शहरात दुर्गापूजेदरम्यान मेस्सीचे २५ फूट उंच आणि २० फूट रुंद असे भव्य भित्तिचित्र उभारले जाईल, ज्यावर चाहते आपले संदेश लिहू शकतील. हे भित्तिचित्र नंतर मेस्सीला भेट म्हणून दिले जाईल.
याच ठिकाणी तो एक 'सॉफ्ट टच' फुटबॉल सामना खेळेल. यावेळी सौरव गांगुली, लिएंडर पेस, जॉन अब्राहम आणि बायचुंग भुतिया यांसारखे दिग्गज सहभागी होतील. या कार्यक्रमासाठी तिकिटाचा किमान दर ३,५०० रुपये असेल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते मेस्सीचा सत्कार केला जाण्याची शक्यता आहे.
१३ डिसेंबरच्या सायंकाळी मेस्सी अहमदाबाद येथे अदानी फाऊंडेशनच्या एका खासगी कार्यक्रमात सहभागी होईल.
१४ डिसेंबर रोजी मेस्सी मुंबईत दाखल होईल. येथे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) येथे दुपारी ३:४५ वाजता 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रम होईल. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ५:३० वाजता 'जीओएटी कप' आणि कॉन्सर्टचे आयोजन केले जाईल. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर 'मुंबई पॅडल जीओएटी कप' आयोजित केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि लिएंडर पेस हे ५ ते १० मिनिटांसाठी मेस्सीसोबत हा सामना खेळू शकतात.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) द्वारे मेस्सी, सचिन तेंडुलकर, एम. एस. धोनी आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत 'जीओएटी कॅप्टन्स मोमेंट' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते, ज्यात अभिनेता रणवीर सिंह, आमिर खान आणि टायगर श्रॉफ हे अभिनेतेही सहभागी होतील.
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, १५ डिसेंबर रोजी मेस्सी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल. त्यानंतर अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी २:१५ वाजता 'जीओएटी कप' आणि कॉन्सर्ट होईल. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) मेस्सीचे मोठे चाहते असलेल्या विराट कोहली आणि शुभमन गिल यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.