ठळक मुद्दे
सुनील गावस्करांची 'वर्कलोड' संकल्पनेवर सडकून टीका
सिराजची उत्कृष्ट कामगिरी
देशासाठी खेळताना वेदना विसरा
लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात ९ बळी घेत भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मोहम्मद सिराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण मालिकेत तब्बल १८५.२ षटके गोलंदाजी करणाऱ्या सिराजच्या अथक परिश्रमाचे कौतुक करताना, भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ‘वर्कलोड’ अर्थात कामाच्या ताणाच्या संकल्पनेवरच सडकून टीका केली आहे. सिराजने आपल्या कामगिरीतून ‘वर्कलोड’ ही केवळ एक मानसिक बाब असल्याचे सिद्ध केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. ४ ऑगस्ट रोजी इंग्लंडच्या गस ॲटकिन्सनची दांडी गुल करणारा चेंडू, हा पाच कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ मालिकेनंतर सिराजने टाकलेला मालिकेतील पाचवा सर्वात वेगवान चेंडू होता. यावरून त्याच्या तंदुरुस्तीचा आणि क्षमतेचा अंदाज येतो.
या संपूर्ण मालिकेत सिराजने केलेल्या कामगिरीची आकडेवारी थक्क करणारी आहे.
एकूण षटके : १८५.3
एकूण बळी : २३
विशेष नोंद : भारत-इंग्लंड मालिकेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज.
ख्रिस वोक्ससह मालिकेतील सर्व पाचही कसोटी सामने खेळणारा तो एकमेव गोलंदाज ठरला.
‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना सुनील गावस्कर यांनी सिराजच्या कामगिरीचे विश्लेषण केले. ते म्हणाले, ‘‘नेहमीच म्हटले जाते की गोलंदाज सामने जिंकून देतात, परंतु सत्य हे आहे की तुम्हाला धावादेखील कराव्या लागतात. भारताला पुरेशा धावा करता आल्या नाहीत, म्हणूनच त्यांना दोन सामने गमवावे लागले. मला वाटते की सिराजने आपले सर्वस्व झोकून देऊन गोलंदाजी केली आणि त्याने या ‘वर्कलोड’च्या संकल्पनेला कायमचे मोडीत काढले आहे.’’
गावसकर पुढे म्हणाले, ‘‘मला आशा आहे की ‘वर्कलोड’ हा शब्द भारतीय क्रिकेटच्या परिभाषेतून हद्दपार होईल. मी हे बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे. सिराजने ५ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधाराच्या आणि देशाच्या अपेक्षेनुसार सलग ६, ७, ८ षटकांचे स्पेल टाकले. मला वाटते की आपण सर्वांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा ‘वर्कलोड’ केवळ एक मानसिक अडथळा आहे, शारीरिक नाही.’’
खेळाडूंच्या मानसिकतेचे महत्त्व अधोरेखित करताना सुनील गावसकर यांनी एक अत्यंत भावनिक पण तितकाच कठोर संदेश दिला. त्यांच्या मते, ‘‘कामाच्या ताणाच्या तकलादू सबबीपुढे जर तुम्ही नमते घेतले, तर तुमचे खरे शिलेदार रणांगणात उतरणारच नाहीत. खेळाडूंना हे स्पष्टपणे सांगावे लागेल की, जेव्हा तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करता, तेव्हा शारीरिक वेदना या दुय्यम ठरतात. त्या क्षणी, त्या वेदना विसरण्याची हिंमत तुमच्यात असायलाच हवी.’’
यावेळी त्यांनी भारतीय जवानांचे उदाहरण दिले. ‘‘देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांकडून तुम्ही हीच अपेक्षा ठेवता. सैनिक कधी थंडीची किंवा प्रतिकूल परिस्थितीची तक्रार करतात असे तुम्हाला वाटते का? ते देशासाठी आपले प्राण देण्यासाठी तिथे असतात. देशासाठी आपले सर्वोत्तम द्या. दुखापतीच्या वेदनेची चिंता करू नका. ऋषभ पंतने तुम्हाला काय दाखवून दिले? तो फ्रॅक्चर असतानाही फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. तुमच्या संघाकडून तुम्ही अशीच अपेक्षा ठेवता,’’ असे म्हणत गावस्कर यांनी खेळाडूंना देशासाठी खेळण्याच्या भावनेचे महत्त्व पटवून दिले.