आशिया चषकानंतर (Asia Cup) आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाकडे (ICC Women's ODI World Cup) वळल्या आहेत. या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. याचाच अर्थ, क्रीडाप्रेमींसाठी आणखी एक रविवार अविस्मरणीय ठरणार आहे.
या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्षाची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी झाली होती, जेव्हा आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना खेळला गेला. त्यानंतर, 21 सप्टेंबर रोजी म्हणजेच पुढील रविवारी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. आणि त्यानंतर बरोबर सात दिवसांनी, 28 सप्टेंबर रोजी आशिया चषकाचा अंतिम सामनाही याच दोन संघांमध्ये झाला. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धुळ चारली.
आता सर्वांचे लक्ष भारतीय महिला क्रिकेट संघावर आहे, ज्यांचा पाकिस्तान विरुद्धचा सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळला जाईल. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल आणि त्याची अनेक कारणे आहेत.
भारतीय पुरुष संघाप्रमाणेच हरमनप्रीतची सेना देखील पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच, केवळ 21 दिवसांच्या कालावधीत पाकिस्तानवर विजय मिळवून, त्यांना चौथ्यांदा पराभूत करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या विश्वचषकात प्रत्येकी एक सामना खेळलेले असतील. भारतीय महिला संघाचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेसोबत झाला, तर पाकिस्तानी संघ आपला पहिला सामना 2 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळेल. या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात 30 सप्टेंबरपासून होत असून, अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.