दुबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली आहे. तिने न्यूझीलंडविरुद्धच्या शतकी खेळीच्या बळावर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. विश्वचषकातील शानदार प्रदर्शनामुळे मानधनाचे रेटिंग तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्तरावर पोहोचले आहे. तिची सहकारी, प्रतिका रावलने देखील 12 स्थानांची मोठी झेप घेतली आहे.
स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्ध 109 धावांची खेळी केली. तर बांगलादेशविरुद्ध नाबाद 34 धावा केल्या. ती 828 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम असून, दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲश्ले गार्डनर (731) पेक्षा ती तब्बल 97 गुणांनी पुढे आहे. 12 स्थानांची झेप घेऊन प्रतिका रावल 564 रेटिंगसह 27व्या स्थानावर पोहोचली आहे, परंतु दुर्दैवाने, दुखापतीमुळे ती आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
स्मृतीने विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली होती आणि तिची सप्टेंबर 2025 साठी ‘आयसीसी महिला प्लेयर ऑफ द मंथ’ म्हणून निवड करण्यात आली होती.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्व्हार्ड्ट दोन स्थानांची झेप घेऊन तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध 90, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 31 धावांची खेळी केली होती. दरम्यान, इंग्लंडच्या ॲमी जोन्सने ‘टॉप-10’ मध्ये स्थान मिळवले आहे. ती 4 स्थानांची झेप घेऊन 9व्या (656) क्रमांकावर पोहोचली आहे. ॲनाबेल सदरलँडने 'टॉप 40' मध्ये सर्वात मोठी झेप घेतली आहे. ती 16 स्थानांनी पुढे सरकत 16वे स्थान गाठले आहे.
महिला गोलंदाजांच्या क्रमवारीत, सोफी एक्लेस्टोन (747) अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अलाला किंग 5 स्थानांची झेप घेऊन दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 18 धावांत 7 बळी घेतले होते. तिची सहकारी ॲश्ले गार्डनर एक स्थान खाली घसरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
याव्यतिरिक्त, पाकिस्तानची नशरा संधू, डावखुरी फिरकीपटू नॉनकुलुलेको म्लाबा (610) सोबत संयुक्तपणे 10व्या स्थानावर पोहोचली आहे. वेगवान गोलंदाज मारिजॅन कॅप्प आणि ॲनाबेल सदरलँड देखील प्रत्येकी एका-एका स्थानाची प्रगती करून अनुक्रमे चौथ्या आणि 7व्या स्थानावर पोहोचल्या आहेत.