Arjun Tendulkar IPL 2026 Pudhari
स्पोर्ट्स

Arjun Tendulkar IPL 2026: अर्जुन तेंडुलकरला संधीच नाही? अश्विनच्या वक्तव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाला?

Arjun Tendulkar IPL 2026: IPL आधी आर. अश्विनने अर्जुन तेंडुलकरबाबत मोठं विधान केलं आहे. लखनऊ सुपरजायंट्समध्ये जबरदस्त स्पर्धेमुळे त्याला एकही सामना खेळायला मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे।

Rahul Shelke

Arjun Tendulkar IPL 2026: IPLचा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब शोमध्ये एक धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या हंगामात अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही.

लखनऊच्या संघात जबरदस्त स्पर्धा

लखनऊ सुपर जायंट्सच्या संघरचनेकडे पाहिलं तर अश्विनचं विधान पूर्णपणे चुकीचं वाटत नाही. संघात वेगवान गोलंदाजांची अक्षरशः फौज आहे. मयंक यादव, मोहसिन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी सारखे अनुभवी आणि प्रभावी खेळाडू आधीच प्लेइंग इलेव्हनसाठी मजबूत दावेदार आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला एनरिक नॉर्खिया देखील या ताफ्यात आहे.

अश्विनने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “अर्जुनला खेळण्याची संधी मिळणं खूप कठीण आहे. इतक्या दर्जेदार गोलंदाजांमध्ये त्याला स्थान मिळवणं अवघड आहे. जोपर्यंत इतर खेळाडूंना दुखापती होत नाहीत, तोपर्यंत त्याला संधी मिळणार नाही.”

पुन्हा बेंचवरच बसावं लागणार?

अर्जुन तेंडुलकरसाठी ही गोष्ट नवीन नाही. मागील काही हंगामांमध्येही त्याला संधी मिळालेली नाही. Mumbai Indians कडून त्याने २०२३ मध्ये पदार्पण केलं, पण त्यानंतरही त्याला नियमित संधी मिळाली नाही.

आजपर्यंत IPL मध्ये अर्जुनने फक्त ५ सामने खेळले असून त्यात त्याने ३ विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ९.३ इतका आहे, जो सरासरीपेक्षा जास्त मानला जातो.

प्रयत्न सुरूच, पण संधी कधी?

अर्जुन हा फक्त गोलंदाज नाही, तर पेस-बोलिंग ऑलराउंडर आहे. अलीकडेच त्याने युवराज सिंग कडून फलंदाजीचं विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. डीवाय पाटील टी20 स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करत आपली क्षमता दाखवून दिली आहे.

पण IPL सारख्या मोठ्या सामन्यांमध्ये केवळ क्षमता पुरेशी नसते. स्पर्धा, टीम कॉम्बिनेशन आणि अनुभव यांचाही मोठा रोल असतो. त्यामुळे अर्जुन समोरचं आव्हान कठीण आहे. IPLमध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळते की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT