स्पोर्ट्स

South Africa Team in Trouble ‘महाराज’च्या दुखापतीने द. आफ्रिकेला धक्का! झिम्बाब्वे दौऱ्यावर मुल्डरकडे नेतृत्वाची धुरा

तीन सामन्यांत तीन कर्णधार, झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची नव्या कर्णधारासमोर आव्हान

रणजित गायकवाड

mulder new captain of south africa team for 2nd test against zimbabwe

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असून, दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना 6 जुलैपासून बुलावायो येथे खेळवला जाणार आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिलेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज केशव महाराज दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.

मांडीतील स्नायू दुखावल्यामुळे महाराज दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी संघात सेनुरन मुथुसामीचा समावेश करण्यात आला असून, त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 4 कसोटी सामने खेळले आहेत. महाराजच्या अनुपस्थितीत, अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर संघाचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे, गेल्या तीन कसोटी सामन्यांमधील तो दक्षिण आफ्रिकेचा तिसरा कर्णधार असेल.

टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली पटकावले होते WTC विजेतेपद

जून महिन्यात लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतिम सामन्यात टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केशव महाराजने संघाचे कर्णधारपद भूषवले आणि संघाने 328 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वियान मुल्डर संघाची धुरा सांभाळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन असणारा द. आफ्रिकेचा संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पहिल्या कसोटीत केशव महाराजचा ऐतिहासिक विक्रम

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केशव महाराजने एक ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 200 बळींचा टप्पा पूर्ण केला. बळींचे द्विशतक पूर्ण करणारा तो द. आफ्रिकेचा पहिलाच फिरकी गोलंदाज ठरला. यापूर्वी ज्या 8 गोलंदाजांनी हा टप्पा ओलांडला होता, ते सर्व वेगवान गोलंदाज होते. महाराजने त्याच्या 59 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 203 बळी घेतले आहेत, ज्यात त्याने 11 वेळा एका डावात पाच बळी आणि एकदा सामन्यात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT