स्पोर्ट्स

Cricket Test Match : तिसऱ्या कसोटी सामन्यावर संकट! ICCच्या अद्याप मान्यतेची प्रतिक्षा

फ्लड लाईट्सच्या कामाला झालेला विलंब हे यामागील प्रमुख कारण.. सामना सुरू होण्यापूर्वी आयसीसीकडून त्याला अद्याप मान्यता मिळणे बाकी आहे.

रणजित गायकवाड

WI vs AUS 3rd Test at Sabina Park require final approval from the ICC

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना 12 जुलैपासून जमैकाच्या सबाइना पार्क येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असेल.

सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना 12 जुलै रोजी किंग्स्टन येथील सबाइना पार्कवर खेळायचा आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असणार आहे, मात्र त्यापूर्वी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. सबाइना पार्क येथील फ्लड लाईट्सच्या कामाला झालेला विलंब हे यामागील प्रमुख कारण असून, सामना सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) त्याला अद्याप मान्यता मिळणे बाकी आहे.

फ्लड लाईट्सच्या प्रकाश तीव्रतेची तपासणी बाकी

जमैकाच्या सबाइना पार्कवर प्रथमच दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार असून, त्यासाठी येथे नवीन फ्लड लाईट्स बसवण्यात येणार होते. या कामाला विलंब झाल्याने लाईट्स बसवण्यात आले असले तरी, ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, किंग्स्टन स्टँडवरील प्रकाश अद्याप पूर्णपणे मानकांनुसार नाही. जमैका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डोनोव्हन बेनेट यांनी सामन्यापूर्वी सर्व गोष्टी सुरळीत केल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, ‘मला पूर्ण विश्वास आहे की सर्व तयारी वेळेत पूर्ण होईल. सर्व काम वेळेवर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जेव्हा तुम्ही बांधकाम करता, तेव्हा काही आव्हाने समोर येतातच, जे आमच्या बाबतीत फ्लड लाईट्स आणि स्कोअरबोर्डच्या संदर्भात घडले.’

आयसीसीचे पथक लवकरच पाहणी दौरा करणार

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयसीसीचे पथक सबाइना पार्कचा पाहणी दौरा करणार आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवला जाईल की नाही, हे सर्वस्वी त्यांच्या निर्णयावर अवलंबून असेल. दुसरीकडे, क्रिकेट वेस्ट इंडिजने हा सामना नियोजित वेळेनुसार होईल आणि त्यानंतर येथे टी-20 मालिकेतील दोन सामनेही खेळवले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, तर दुसरा सामना ग्रेनेडा येथे खेळवला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT