why virat kohli left test captaincy
नवी दिल्ली : टीम इंडियाचा वनडेतील स्टार फलंदाज विराट कोहलीने जानेवारी २०२२ मध्ये कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिलाहोता. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करताना ४० विजय मिळवून दिले होते. कसोटीमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक अशी त्याची ओळख झाली. कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या काही महिने आधी, कोहलीने टी२० (T20I) संघाचे नेतृत्वही सोडले होते आणि त्यानंतर त्याला वनडे (ODI) कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले होते. नुकतेच, विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद कोणत्या कारणामुळे सोडले याचा खुलासा केला आहे.
'आरसीबी इनोव्हेशन लॅब'च्या 'इंडियन स्पोर्ट्स समिट'मध्ये बोलताना कोहलीने म्हणाला की, कर्णधारपदाने आपल्याला नकळत आतून पूर्णपणे थकवून टाकले होते. मी अशा एका टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे मी आमच्या फलंदाजीचा आणि नेतृत्वाचा मुख्य केंद्रबिंदू बनलो होतो. भारतीय क्रिकेट नेहमी अव्वल स्थानी राहावे यासाठी मी इतका प्रेरित आणि उत्सुक होतो की, या दोन्ही गोष्टींचा माझ्या दैनंदिन जीवनावर किती ताण पडत आहे, हे माझ्या लक्षातच आले नाही. मी जेव्हा कर्णधारपद सोडले, तेव्हा मी पूर्णपणे खचलो होतो. मी त्यात पूर्णपणे गुरफटून गेलो होतो. तो काळ अत्यंत कठीण होता. लोकांच्या अपेक्षा सांभाळणे खूप अवघड जात होते," असेही कोहलीने स्पष्ट केले.
"माझ्या सुवर्णकाळात संघ सुरक्षित राहील आणि ड्रेसिंग रूममध्ये कोणत्याही प्रकारची असुरक्षितता निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे हे मुख्य उद्दिष्ट होते. यासाठी मला तत्कालीन मॅनेजमेंट रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमला याचे मोठे श्रेय द्यावे लागेल,असेही कोहलीने नमूद केले.
भारताचे कर्णधारपद सोडल्यानंतर आपण अत्यंत त्रासदायक आणि कठीण टप्प्यातून गेलो. पण तुमचा फॉर्म नेहमी सारखा राहत नाही आणि जेव्हा फॉर्म खराब होतो, तेव्हा या दोन्ही जबाबदाऱ्या तुमच्यावर दडपण आणू लागतात. त्यामुळे तो काळ खरोखरच कठीण होता, अशी कबुलीही कोहलीने दिली.
परंतु, क्रिकेट खेळण्याचा खरा आनंद पुन्हा शोधून दिल्याबद्दल त्याने राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांचे मनापासून आभार मानले. मी जेव्हा कर्णधारपद सोडले, तेव्हाच मी लोकांशी उघडपणे बोलू शकलो. मी राहुल भाई (द्रविड) आणि विक्रम राठोड यांच्यासारख्या व्यक्तींसोबत खूप गोष्टी शेअर केल्या. २०२३ मध्ये माझी कसोटी क्रिकेटमधील कामगिरी उत्तम झाली आणि मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो, तेव्हा मनापासून त्यांचे आभार मानतो. त्यांनी माझी अशा प्रकारे काळजी घेतली की, मला पुन्हा एकदा त्यांच्यासाठी खेळावेसे वाटू लागले. मला मैदानात उतरून सर्वोत्तम कामगिरी करायची होती, घाम गाळायचा होता. ते खूप काळजी घेणारे आणि प्रोत्साहन देणारे होते. मी आतापर्यंत काय साध्य केले आहे, याची जाणीव त्यांनी मला करून दिली," असेही कोहलीने स्पष्ट केले.