Why Virat Kohli Missed T20 World Cup 2026: भारताने सलग दुसऱ्यांदा टी २० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनल सामन्यात भारतान न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. या विजयी सोहळ्याचे साक्षीदार भारताचे दोन माजी वर्ल्डकप विजेते कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा देखील होते. मात्र या दोन दिग्गांमध्ये अजून एका दिग्गज खेळाडूची आठवण सर्वांनाच झाली. तो म्हणजे विराट कोहली.
यंदाचा वर्ल्डकप भारतात होत असल्यानं अनेक माजी खेळाडूंनी मैदानावर हजेरी लावली होती. मात्र भारताची रन मशिन विराट कोहली मात्र कुठं दिसला नाही. धोनी तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त झाला आहे. मात्र विराट आणि रोहित अजून भारताकडून वनडे क्रिकेट खेळत आहेत. मैदानावर धोनी अन् रोहितच्या उपस्थितीची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा विराटच्या अनुपस्थितीची होत आहे.
विराट कोहली का आला नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. मात्र विराटच्या न येण्याची संभाव्य दोन कारणे समोर येत आहेत. अर्थात याबाबत विराट कोहलीकडून अधिकृतरित्या काही सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळं खरं कारण विराट कोहलीलाच माहिती. मात्र विराटच्या न येण्याच्या दोन शक्यता दिसत आहेत.
एम.एस. धोनी आणि रोहित शर्मा हे फायनलमध्ये हजर होते कारण दोघेही माजी टी २० वर्ल्डकप कर्णधार आहेत. पहिल्या टी २० वर्ल्डकपचे विजेतेपद धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतानं पटकावलं होतं. त्यानंतर २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं दुसऱ्यांदा टी २० वर्ल्डकप जिंकला.
विराट कोहली कर्णधार असताना भारताला टी २० वर्ल्डकप जिंकता आला नाही. त्यामुळं विराट कोहली माजी विश्वविजेता कर्णधार म्हणून या सोहळ्याला हजर राहू शकत नव्हता. असं असलं तरी टी २० क्रिकेटमधील विराट कोहलीचं योगदान कुठेही कमी होत नाही.
विराट कोहलीने जरी पूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं नसलं तरी तो ज्यावेळी स्पर्धा नसते त्यावेळी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतो. विराट कोहलीने टी २० आणि कसोटीचा फॉरमॅट सोडला आहे. मागे एका मुलाखतीदरम्यान, विराट कोहलीने सांगितलं होतं की एकदा का तो निवृत्त झाला की लोकांना त्याला खूप काळ पाहता येणार नाहीये.
विराट म्हणाला होता की, 'मी ज्यावेळी थांबेन त्यावेळी मी गायब होणार आहे. तुम्ही मला खूप मोठा काळ पाहू शकणार नाही. त्यामुळं मी जोपर्यंत खेळत आहे तोपर्यंत मी माझं सर्वस्व देत आहेत. ही एक गोष्टच मला प्रेरणा देत आहे.'