T20 World Cup Trophy Rule: भारताने टी-२० विश्वचषक जिंकत इतिहास रचला आहे. अहमदाबादमधील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर तब्बल ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे, स्वतःच्या देशात विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे.
या ऐतिहासिक यशानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी उंचावत चाहत्यांसोबत जल्लोष साजरा केला. मात्र आता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. लवकरच ही ट्रॉफी भारतीय संघाकडून परत घेतली जाणार आहे.
हे ऐकून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटत असले तरी यामागे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) नियम आहे. आयसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही स्पर्धेतील विजेत्या संघाला कायमस्वरूपी मूळ ट्रॉफी दिली जात नाही. अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात विजेत्या संघाला काही काळासाठी खरी ट्रॉफी दिली जाते. त्या वेळी खेळाडू ट्रॉफीसह फोटोशूट करतात, विजयाचा आनंद साजरा करतात. मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर मूळ ट्रॉफी पुन्हा आयसीसीकडे परत जाते.
त्यानंतर विजेत्या संघाला रेप्लिका किंवा डमी ट्रॉफी दिली जाते. ही ट्रॉफी दिसायला मूळ ट्रॉफीसारखीच असते आणि तीच संघाच्या ताब्यात कायमस्वरूपी ठेवली जाते. या रेप्लिका ट्रॉफीतही सोने आणि चांदीचा वापर केलेला असतो, त्यामुळे ती मूळ ट्रॉफीइतकीच आकर्षक दिसते. मूळ ट्रॉफी मात्र आयसीसीच्या दुबई येथील मुख्यालयात सुरक्षित ठेवली जाते. चोरी, नुकसान किंवा इतर कोणत्याही धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाते.
टी-२० विश्वचषकाच्या ट्रॉफीबद्दल बोलायचे झाले, तर ती सुमारे ६ किलो वजनाची आणि सुमारे २१ इंच उंचीची आहे. या ट्रॉफीचे भारताशी एक खास नातेसुद्धा आहे. कारण तिची रचना करणारे डिझायनर अमित पबुवाल हे राजस्थानमधील जयपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या डिझाइनमुळे ही ट्रॉफी जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक मानली जाते.
एकूणच, भारतीय संघाने जिंकलेली मूळ ट्रॉफी आयसीसीकडे परत जाणार असली तरी भारताला मिळणारी रेप्लिका ट्रॉफी ही त्या ऐतिहासिक विजयाचे कायमस्वरूपी प्रतीक राहणार आहे. त्यामुळे भारताच्या या शानदार कामगिरीची आठवण क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे.