IPL Smart Sunglasses Ban Pudhari
स्पोर्ट्स

IPL Smart Sunglasses Ban: IPL मध्ये स्मार्ट सनग्लासेस वर बंदी! BCCI चा मोठा निर्णय; नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा

IPL Smart Sunglasses Ban: IPL 2026 दरम्यान BCCI ने खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर बंदी घातली आहे.

पुढारी वृत्तसेवा

IPL Smart Sunglasses Ban: IPL 2026 अजून संपलेली नसतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. यावेळी BCCI ने खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. IPL च्या सुरक्षेला आणि सामन्यांच्या निष्पक्षतेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

BCCI च्या Anti-Corruption Unit (ACU) ने सर्व फ्रँचायझींना यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, PMOA (Players and Match Officials Area) म्हणजेच खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांना आता स्मार्ट सनग्लासेस वापरण्यास सक्त मनाई असेल. नियम मोडणाऱ्यांवर IPL च्या आचारसंहितेनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

स्मार्ट सनग्लासेस वर बंदी का?

साधे गॉगल्स आणि स्मार्ट सनग्लासेस यात मोठा फरक आहे. Smart Sunglasses हे केवळ डोळ्यांचे संरक्षण करणारे गॉगल्स नसून त्यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स असतात. काही स्मार्ट गॉगल्समध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉलिंग, फोटो-व्हिडिओ रेकॉर्डिंग, मेसेज पाठवणे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी अशा सुविधा उपलब्ध असतात.

BCCI च्या मते, अशा डिव्हाइसचा गैरवापर झाल्यास सामना सुरू असताना संवेदनशील माहिती बाहेर जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग सारख्या बाबींना रोखण्यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

BCCI ने स्मार्ट सनग्लासेसना ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइस आणि कम्युनिकेशन डिव्हाइस या दोन्ही श्रेणींमध्ये ठेवले आहे. त्यामुळेच PMOA परिसरात त्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

आता मोबाईलसोबत स्मार्ट सनग्लासेस ही जमा करावे लागणार

या नव्या नियमानुसार, IPL मधील खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांना प्लेइंग एरियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपले मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि Smart Sunglasses सुरक्षा अधिकाऱ्यांकडे जमा करावे लागतील.

याआधी मोबाईल आणि स्मार्ट वॉचवर निर्बंध होतेच, मात्र आता Smart Sunglasses चाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

नियम मोडल्यास काय होणार?

BCCI ने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर एखाद्या खेळाडूने किंवा सपोर्ट स्टाफने Smart Sunglasses जमा न करता वापरले, तर त्याच्यावर IPL च्या Code of Conduct अंतर्गत कारवाई केली जाईल. यामध्ये दंड, चेतावणी किंवा आणखी कठोर शिक्षेचाही समावेश असू शकतो.

राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरवर झाली होती कारवाई

IPL 2026 मध्ये यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजर रोमी भिंडर यांच्यावर सामन्यादरम्यान डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यांना इशारा देण्यात आला होता आणि 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

सुरक्षा वाढवण्यासाठी BCCI चे सलग कठोर निर्णय

IPL 2026 दरम्यान BCCI सुरक्षेच्या मुद्द्यावर अधिक कठोर झाल्याचे दिसत आहे. याआधी खेळाडूंना परवानगीशिवाय रात्री बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. तसेच हनी ट्रॅप आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या हॉटेल रूममध्ये पाहुण्यांना येण्यावरही निर्बंध आणण्यात आले होते.

आता स्मार्ट सनग्लासेस वरील बंदी हा त्याच मालिकेतील आणखी एक मोठा निर्णय मानला जात आहे. IPL मध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि स्पर्धेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी BCCI कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसल्याचे या निर्णयातून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT