Vaibhav Suryavanshi IPL 2025
जयपूर : आयपीएलच्या मैदानात हजारो प्रेक्षकांच्या समोर उभा राहून जगातील मोठमोठे नाव कमवलेल्या गोलंदाजांच्या चिंध्या उडवत राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक झळकावले. त्याने जगातील सर्वात तरुण फलंदाजाच्या पाटीवर आपले नाव कोरले आहे. वैभवचा हा प्रवास सोपा नव्हता. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला खूप संघर्षांचा सामना करावा लागला आहे. क्रिकेटसाठी त्याच्या वडिलांना जमीन विकावी लागली. वैभवच्या वयावरही प्रश्न उपस्थित केले गेले, परंतु त्याच्या ताकदीने आणि दृढनिश्चयाच्या बळावर स्वत:ला सिद्ध केले. जाणून घ्या वैभवच्या संघर्षाची गोष्ट...
सोमवारी गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फलंदाज वैभवने ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. या लीगमध्ये तो सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडूही ठरला. वैभव आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केले. सोमवारच्या सामन्यात मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, करीम जन्नत या सर्वांचा जवळपास बाराशे टी-२० खेळण्याचा अनुभव, पण आपल्या प्रतिभेने सर्वांवर मात करीत वैभवने शतक केले. केवळ ३५ चेंडूंत त्याने शतकाला गवसणी घातली. जगातील सर्वात वेगवान शतकाच्या यादीत हे दुसरे शतक ठरले. पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल (३० चेंडू) असून वैभवने युसूफ पठाण (३७) याला मागे टाकले. त्यामुळे तो सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू ठरला.
असे म्हणतात की, मुलाचे भविष्य पाळण्यातच दिसते. वैभवच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात २० चेंडूत ३४ धावांची खेळी ही प्रतिभेची झलक होती. आता त्याने शतक ठोकून जगाला त्याची ताकद दाखवून दिली आहे. शार्दुल ठाकूर, आवेश खान, सिराज, इशांत शर्मा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान आणि करीम जनात असे अनुभवी गोलंदाज असताना फटके लगावून त्याने आपल्याला लहान समजण्याची चूक करू नये, असे सूचित केले आहे. सोमवारी गुजरातविरुद्धच्या डावात वैभवने सात चौकार आणि ११ षटकार मारले होते. त्याचे फटके बाणासारखे शक्तिशाली आणि अचूक होते. त्याचे पटना येथील प्रशिक्षक मनीष ओझा म्हणतात, 'तुम्ही त्याच्या फटक्यांमध्ये ताकद पाहिली असेलच. तुम्ही बॅटचा स्विंग आणि योग्य वेळ पाहिली असेलच. जर षटकार मारण्यासाठी ताकद हाच एकमेव निकष असता तर पैलवान क्रिकेट खेळले असते. हे पाच वर्षांचे प्रशिक्षण आहे, ज्यामध्ये वैभव दररोज ६०० चेंडू खेळत होता, असे ओझा म्हणाले.
वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांची समस्तीपूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या मोतीपूर गावात जमीन होती. मुलाचे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ती शेतजमीन विकली. बिहार क्रिकेट असोसिएशनने वैभवला पाठिंबा दिला आणि त्याला रणजी ट्रॉफीमध्ये स्थान मिळवून दिले. तिलक नायडू यांच्या नेतृत्वाखालील १९ वर्षांखालील राष्ट्रीय निवड समितीने त्याला कोल्ट टेस्ट क्रिकेटमध्ये बढती दिली. राजस्थान रॉयल्सच्या राहुल द्रविड आणि झुबिन भरुचा यांनी आयपीएल सुरू होण्यापूर्वी त्याला १५० च्या वेगाने साइड-आर्म थ्रोडाउनचा सामना करायला लावला होता. त्याचे वडील त्याला सामने दाखवण्यासाठी दररोज १०० किलोमीटर प्रवास करायचे. आई त्याच्या खाण्याच्या सवयींबद्दल खूप काळजी घेत असे.
वैभवचे प्रशिक्षक ओझा यांनी सांगितले की, "जेव्हा तो आठ वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला माझ्याकडे घेऊन आले. प्रत्येक मुलगा वेगळा असतो, त्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत त्याला शिकवलेले अंमलात आणण्याची समज होती. त्याची पद्धत, बॅकलिफ्ट, अंमलबजावणी, हेतू, सर्व काही नेहमीच सुसंगत होते. वैभवच्या प्रशिक्षण सत्रांचे सुमारे ४० व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केले आहेत. तुम्हाला दिसेल की त्याचा बॅट स्विंग युवराज सिंगसारखा आहे. वैभवने आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन सामन्यांमध्ये ७५.५० च्या सरासरीने आणि २२२.०५ च्या स्ट्राईक रेटने १५१ धावा केल्या आहेत.
गेल्या वर्षी आयपीएल मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १.१ कोटी रुपयांना खरेदी केले. २७ मार्च २०११ रोजी बिहारमध्ये जन्मलेला वैभव हा लिलावात विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. मात्र, लिलावात वाद सुरू झाला आणि त्याच्या वयाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. वैभवच्या वयाच्या वादावर वडील संजीव म्हणाले होते की, जेव्हा तो साडेआठ वर्षांचा होता तेव्हा बीसीसीआयने त्याच्या हाडांची चाचणी केली होती. तो या बाबतीत कोणाला घाबरत नाही.