Gold Medal Winning Boxer Preeti Pawar Pudhari
स्पोर्ट्स

Preeti Pawar: आजारपण, अडचणी आणि संघर्षावर मात करत जिंकले सुवर्णपदक; भारताची नवी बॉक्सिंग क्वीन प्रीती पवार कोण आहे?

Gold Medal Winning Boxer Preeti Pawar: भारताची युवा बॉक्सर प्रीती पवारने संघर्ष आणि आजारपणावर मात करत कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Medal Winning Boxer Preeti Pawar: भारताची युवा बॉक्सर प्रीती पवारने 54 किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अवघ्या 22 वर्षांच्या या खेळाडूने गेल्या काही वर्षांत अनेक अडचणींवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.

प्रीतीच्या संघर्षमय यशाची कहाणी

54 किलो वजनी गटात (बँटमवेट) खेळणाऱ्या प्रीतीने 2023 मध्ये वरिष्ठ जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत पदार्पण केले. त्या स्पर्धेत ती प्री-क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचली. त्याच वर्षी तिने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रताही मिळवली.

आजारपणामुळे ऑलिम्पिकच्या तयारीत अडचण

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी प्रीतीला हिपॅटायटिस-A हा संसर्ग झाला. त्यामुळे तिच्या खेळावर मोठा परिणाम झाला. तरीही तिने हार मानली नाही आणि स्पर्धेत राऊंड ऑफ 16 पर्यंत मजल मारली.

या अनुभवातून तिने एक महत्त्वाचा धडा शिकला. तिच्या मते, आयुष्यात प्रत्येक गोष्ट नियोजनाप्रमाणे घडतेच असे नाही. त्यामुळे आता ती प्रत्येक स्पर्धेत संयम आणि डोक शांत ठेवून मैदानात उतरते.

अलीकडच्या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

ऑलिम्पिकनंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर प्रीतीने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. तिने 2025 वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर स्पेनमध्ये झालेल्या बॉक्सम एलिट इंटरनॅशनल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. याचबरोबर आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपद

प्रीतीने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. काही दिवसांपूर्वी ती म्हणाली होती, "माझी इच्छा भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची आहे. मात्र खेळात काहीही निश्चित नसते. आपण योजना आखतो, पण प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडतीलच असे नाही." पण तिने सुवर्णपदक जिंकून देशाचा मान वाढवला आहे.

2028 ऑलिम्पिकवरही लक्ष

प्रीतीचे अंतिम ध्येय 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आहे. त्यासाठी ती अजूनही आपल्या खेळात सातत्याने सुधारणा करत आहे. ती सांगते की, तिला काउंटर अटॅक, तांत्रिक कौशल्य आणि मानसिक तयारीवर अधिक मेहनत घ्यायची आहे. आक्रमक शैलीसोबत बचावात्मक आणि काउंटर गेमही मजबूत करण्यावर तिचा भर आहे.

रिंगबाहेर कलाकार म्हणून ओळख

रिंगमध्ये आक्रमक खेळ करणारी प्रीती रिंगबाहेर मात्र अतिशय शांत आणि सर्जनशील आहे. तिला क्विलिंग आर्ट, कॅलिग्राफी, हस्तकला आणि चित्रकला करण्याची आवड आहे. मोकळ्या वेळेत ती विविध कलाकुसरीचे प्रोजेक्ट तयार करते. नुकतेच तिने क्विलिंग आर्टमधून एक सुंदर फ्रेम तयार केली होती.

स्पर्धांदरम्यान मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रीती नेहमी मंडला आर्ट कलरिंग बुक सोबत ठेवते. त्याचबरोबर ती नियमित ध्यान (Meditation) करते. तिच्या मते, या गोष्टींमुळे मन शांत राहते आणि स्पर्धेपूर्वी लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

संघर्ष, मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर प्रीती पवारने भारतीय बॉक्सिंगमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. 2028 ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. तिची ही प्रेरणादायी वाटचाल अनेक तरुण खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT