स्पोर्ट्स

T20 World Cup : वानखेडेवर कॅरेबियन 'वादळ'! नेपाळचा धुव्वा उडवत वेस्ट इंडिजची सुपर-८ मध्ये धडक

विंडिजने सलग तीन सामने जिंकले, 'सुपर-८' फेरीसाठी पात्र ठरणारा स्पर्धेतील पहिली संघ

रणजित गायकवाड

West Indies first team to Reach in Super 8 Round in T20 World Cup

मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रविवारी (दि. १५) क्रिकेट चाहत्यांना कॅरेबियन पॉवरचा जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारात वेस्ट इंडिजने आपला विजयी वारू उधळत नेपाळचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह सलग तीन सामने जिंकून विंडिजने 'सुपर-८' फेरीसाठी पात्र ठरणारा स्पर्धेतील पहिली संघ होण्याचा मान पटकावला आहे.

होल्डरची 'धार' अन् फोर्डचा 'वार'

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार शे होपचा निर्णय विंडिजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मॅथ्यू फोर्डने सुरुवातीलाच नेपाळच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्याने ४ षटकांत अवघ्या १० धावा देत नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलचा महत्त्वाचा बळी टिपला. अनुभवी जेसन होल्डरने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत २७ धावांत ४ गडी बाद करून नेपाळचे कंबरडे मोडले. नेपाळची अवस्था एकवेळ ५ बाद ४६ अशी दयनीय होती. मात्र, दीपेंद्र सिंह ऐरी (५८ धावा) आणि सोमपाल कामी (२६*) यांच्या झुंजार खेळीमुळे नेपाळला २० षटकांत ८ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.

कॅरेबियन फलंदाजीचा 'रुद्र अवतार'

१३४ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी वानखेडेवर चौकार-षटकारांची आतषबाजी केली. सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार शे होप आणि शिमरोन हेटमायर यांनी नेपाळच्या गोलंदाजीची पिसे काढली.

शे होपने ४४ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६१ धावांची कर्णधारी खेळी केली. त्याला हेटमायरने ३२ चेंडूंत ४६ धावांची नाबाद साथ दिली. या जोडीने अवघ्या १५.२ षटकांत ९१ धावांची अभेद्य भागीदारी करत लक्ष्य आरामात गाठले.

नेपाळचे आव्हान संपुष्टात

या पराभवामुळे नेपाळचे या विश्वचषकातील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले आहे. सलग तीन पराभवांमुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा संघ आता १९ फेब्रुवारीला इटलीविरुद्ध आपला अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.

‘‘सुपर-८ फेरीत पोहोचणे हा आमच्या प्रवासातील पहिला टप्पा होता. संघातील प्रत्येक खेळाडू आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे, याचा आनंद आहे,’’ अशा शब्दांत सामनावीर जेसन होल्डरने आपला आत्मविश्वास व्यक्त केला.

संक्षिप्त धावफलक

  • नेपाळ : १३३/८ (२० षटके) - दीपेंद्र सिंह ५८, जेसन होल्डर ४/२७.

  • वेस्ट इंडिज : १३४/१ (१५.२ षटके) - शे होप ६१*, शिमरोन हेटमायर ४६*.

  • निकाल : वेस्ट इंडिज ९ गडी राखून विजयी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT