फाईल फोटो. Pudhari News
स्पोर्ट्स

WCL 2026 : भारतीय संघाशी 'नडणे' पडले भलतेच महागात! 'माफी'च सोडा, पाकिस्तान थेट स्पर्धेतूनच आऊट!

WCL आयोजकांनी 'पीसीबी'च्या अटी मान्य करण्याची मागणी धुडकावली

पुढारी वृत्तसेवा

WCL 2026 Pakistan Champions Out : भारतीय संघाकडून लेखी माफी मागण्याची हिंमत करणाऱ्या 'पाकिस्तान चॅम्पियन्स' संघाला चांगलाच दणका बसला आहे. 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स' (WCL) आयोजकांनी पाकिस्तानची मागणी धुडकावली आहे. त्यामुळे आता थेट या स्पर्धेतूनच आऊट होण्याची नामुष्की पाकिस्तान क्रिकेट संघावर ओढवली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांमधील साखळी फेरीतील सामना रद्द करण्यात आला होता. भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने उपांत्य फेरीत पाकिस्तानला 'वॉकओव्हर' मिळाला आणि पाकिस्तान संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला होता.

'पाकिस्तान चॅम्पियन्स'चे निवेदन जारी

सोमवार, ५ ऑक्‍टोबर रोजी जारी केलेल्या निवेदनात 'पाकिस्तान चॅम्पियन्स'ने म्हटले आहे की, "आम्हाला हे सांगताना खेद वाटतो की, 'पाकिस्तान चॅम्पियन्स' संघ WCL च्या चालू हंगामात सहभागी होऊ शकणार नाही, कारण पीसीबीने आवश्यक NOC न देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आम्ही पीसीबीचे अधिकार आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. साहजिकच, क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या या जागतिक स्पर्धेत 'पाकिस्तान चॅम्पियन्स'चे प्रतिनिधित्व करण्याची संधी आमच्या खेळाडूंना मिळणार नाही, याचे आम्हाला दुःख आहे."

भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम

मागील हंगामात, राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, 'इंडिया चॅम्पियन्स'ने 'पाकिस्तान चॅम्पियन्स'विरुद्धचे नियोजित सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर, पीसीबीने स्पर्धेच्या आयोजकांवर टीका केली होती आणि आपल्या खेळाडूंच्या या लीगमध्ये सहभागावर निर्बंध घातले होते.

भारतीय संघाला अट घालणे पडले भलतेच महागात

रिपोर्टनुसार, पीसीबी काही अटींच्या अधीन राहून खेळाडूंना NOC देण्यास तयार होते. यामध्ये गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याबद्दल भारतीय खेळाडूंकडून लेखी माफीची मागणी आणि दोन्ही संघांमधील हस्तांदोलन हमी यांसारख्या अटींचा समावेश होता. WCL आयोजकांनी पीसीबीच्या काही अटी मान्य केल्या होत्या. मात्र माफी मागणे आणि हस्तांदोलनाशी संबंधित मागण्या मान्य करण्यास त्यांनी नकार दिला. या घडामोडीनंतर, 'पाकिस्तान चॅम्पियन्स'ने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

१० ऑक्टोबरचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द

'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स' स्पर्धेतील घडामोडींमुळे १० ऑक्टोबर रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही होणार नाही. 'पाकिस्तान चॅम्पियन्स' WCL च्या मागील दोन्ही हंगामांत उपविजेते ठरले होते. २०२४ च्या पहिल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात हा संघ 'इंडिया चॅम्पियन्स'कडून पराभूत झाला, २०२५ च्या अंतिम सामन्यात 'साउथ आफ्रिका चॅम्पियन्स'ने पाकिस्तान संघाचा पराभव केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT