Cricket News : इचलकरंजीच्या श्रुतिका गुंडपची जपानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड! कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली

ichalkaranji girl shrutika sandeep gundap selected in japan national cricket team
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : वस्त्रनगरी इचलकरंजी येथील श्रुतिका संदीप गुंडप हिची जपानच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी तिने मिळवलेले हे यश थक्क करणारे आहे. तिच्या या यशाने केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.

श्रुतिकाचा प्रेरणादायी प्रवास

श्रुतिका गेली १० वर्षे जपानमध्ये वास्तव्यास आहे. तिच्यासाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर तिची ओळख बनला आहे. तिची ही वाटचाल थक्क करणारी आहे. श्रुतिका ही सध्या जपानमधील ‘इंडियन इंटरनॅशनल स्कूल’मध्ये इयत्ता ११वीमध्ये शिकत आहे. तिच्यातील क्रिकेटच्या गुणवत्तेला पहिला चालना मिळाली ती इचलकरंजीतील ‘मास्टर क्रिकेट क्लब’मध्ये. प्रशिक्षक विनय कोपड यांच्या मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवले.

जपानमध्ये स्थायिक झाल्यावरही तिने आपली आवड जोपासली. ‘टोकियो टायटन्स क्रिकेट क्लब’कडून खेळताना प्रशिक्षक अफरोज खान आणि आशिष नेवे यांनी तिच्या कौशल्याला पैलू पाडले. आता जपानच्या राष्ट्रीय संघात तिच्यावर यष्टीरक्षक आणि फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे.

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

श्रुतिकाच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. तिचे वडील, संदीप गुंडप, हे व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असून जपानमध्ये कन्सल्टन्ट म्हणून कार्यरत आहेत. तिची आई, कोमल गुंडप, या गृहिणी आहेत. तर धाकटी बहीणही जपानमध्येच शिकत आहे.

या यशाबद्दल बोलताना संदीप गुंडप भावुक होऊन सांगतात, ‘जपानमध्ये क्रिकेटला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे भारतासारख्या देशातून आलेल्या खेळाडूंसाठी इथे सुवर्णसंधी आहेत. श्रुतिकाने या संधीचे सोने केले. तिच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. येत्या काळात इथून अनेक खेळाडू तयार होऊन जपानचे नेतृत्व करतील.’

महाराष्ट्रासाठी दुहेरी आनंदाचा क्षण

विशेष म्हणजे, या संघात निवड झालेली श्रुतिका ही एकमेव महाराष्ट्रीयन कन्या नाही. तिच्यासोबतच मूळच्या बारामती तालुक्यातील मोरगाव येथील इशिता कुदळे हिनेही जपानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. या दोन्ही लेकींनी परदेशात मिळवलेले हे यश महाराष्ट्रासाठी दुहेरी आनंदाचा क्षण आहे.

अभ्यासातही ‘चॅम्पियन’

श्रुतिका केवळ एक उत्कृष्ट खेळाडूच नाही, तर एक हुशार विद्यार्थिनीसुद्धा आहे. खेळाच्या सरावात व्यस्त असूनही तिने अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. गेल्या वर्षी इयत्ता १०वीच्या परीक्षेत तिने तब्बल ९६% गुण मिळवून आपण ‘ऑल-राऊंडर’ असल्याचे सिद्ध केले आहे.

आपल्या मातीपासून दूर, एका वेगळ्या संस्कृतीत राहून आपल्या आवडीला जिद्दीने जोपासणे आणि त्यात उत्तुंग यश मिळवणे, हे श्रुतिका आणि इशिताने दाखवून दिले आहे. त्यांची ही निवड केवळ एक सुरुवात आहे. त्यांचा हा प्रवास अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news