WCL 2025 India vs Pakistan legends match
मुंबई : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) स्पर्धेतील आजचा भारत-पाकिस्तान सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. या स्पर्धेत केवळ निवडक देश सहभागी आहेत आणि यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू भाग घेत आहेत. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याच्या आयोजनाबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात होता, त्यामुळे अनेक भारतीय खेळाडूंनी या सामन्यातून माघार घेतली.
WCL आयोजकांनी सामन्याच्या रद्दबातलची घोषणा करताना स्पष्टीकरण दिलं की, त्यांनी भारत-पाकिस्तानमधील सामना का आयोजित केला होता. युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बर्मिंघमच्या एजबस्टन मैदानावर होणार होता. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सामना सुरू होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी तो रद्द करण्यात आला. कारण, काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सैनिकी कारवाई केली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.
या सामन्यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असताना, शिखर धवन आणि हरभजन सिंग यांनी आधीच या सामन्यातून माघार घेतली होती. याशिवाय हरभजन सिंग आणि सुरेश रैनानेही सामन्यातून माघार घेतली होती. युवराजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा स्पर्धेतील पहिला सामना असणार होता. संघात शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि अंबाटी रायुडू यांचाही समावेश होता.
WCL आयोजकांनी निवेदन जारी करत सामन्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “आम्ही केवळ प्रेक्षकांना आनंदाचे क्षण द्यावेत, यासाठी भारत-पाकिस्तान सामना ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या निर्णयामुळे अनेकांची मने दुखावली गेली हे आम्ही मान्य करतो.” ते पुढे म्हणाले, “क्रिकेटमधील प्रेम आणि देशाच्या भावना आम्हालाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आम्ही हा सामना रद्द करत आहोत आणि मन:पूर्वक माफी मागत आहोत.”