

बर्न; वृत्तसंस्था : विश्वविजेत्या स्पेनने यजमान स्वित्झर्लंडचा 2-0 ने पराभव करत महिला युरो 2025 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. या पराभवासह घरच्या मैदानावर हजारो चाहत्यांच्या साक्षीने खेळणार्या स्वित्झर्लंडचा स्पर्धेतील स्वप्नवत प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आला. दोन पेनल्टी किक हुकवूनही स्पेनने सामन्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले, हे या लढतीचे ठळक वैशिष्ट्य ठरले.
वांकडॉर्फ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच स्पेनने आक्रमक खेळ केला. मात्र, स्वित्झर्लंडच्या मजबूत बचावामुळे त्यांना गोलसाठी उत्तरार्धापर्यंत वाट पाहावी लागली. सामन्याच्या उत्तरार्धात पाच मिनिटांच्या अंतराने केलेल्या दोन गोलनी स्पेनचा विजय निश्चित केला.
बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या अथिनिया डेल कॅस्टिलोने 66 व्या मिनिटाला गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी, 71 व्या मिनिटाला क्लॉडिया पिनाने डी-बॉक्सच्या बाहेरून एक अप्रतिम गोल करत स्पेनची आघाडी 2-0 अशी वाढवली. विशेष म्हणजे, स्पेनने या सामन्यात दोन पेनल्टी किक गमावल्या. सामन्याच्या नवव्या मिनिटाला मॅरिओना कॅल्डेन्टे तर 88 व्या मिनिटाला लेक्सिया पुटेलास पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरल्या. याशिवाय स्पेनचे तीन प्रयत्न गोलपोस्टला लागून वाया गेले. स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली, पण विश्वविजेत्या संघापुढे त्यांची कामगिरी तोकडी पडली.
आता उपांत्य फेरीत स्पेनचा सामना फ्रान्स किंवा जर्मनी यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. या सामन्यात स्वित्झर्लंडच्या नोएल मॅरिट्झला रेड कार्ड मिळाले, तर स्पेनची लायया दुसर्या यलो कार्डमुळे उपांत्य फेरीला मुकणार आहे.