स्पोर्ट्स

Vishnu Solanki : चिमुकलीवर अंत्यसंस्कार करून मैदानात परतला अन् शतक झळकावले

Arun Patil

भुवनेश्वर ; वृत्तसंस्था : बडोदा संघाचा फलंदाज विष्णू सोलंकीच्या (Vishnu Solanki) तान्ह्या बाळाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. मात्र, खासगी आयुष्यातील हे दुःख बाजूला सारत विष्णू मैदानात उतरला आणि त्याने चंदीगढच्या संघाविरुद्ध दमदार शतक ठोकले.

रणजी स्पर्धेच्या 2022 च्या पर्वामध्ये शुक्रवारी विष्णूने भुवनेश्वरमध्ये खेळताना ही कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर बडोद्याचा संघ दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सात बाद 398 धावांपर्यंत मजल मारू शकला. चंदीगढवर बडोद्याने 230 धावांची आघाडी घेतली आहे. चंदीगढचा पहिला डाव 168 धावांवर आटोपला.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विष्णूने 161 चेंडूंमध्ये नाबाद 103 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार लगावले. ज्योत्सनील सिंगने त्याला चांगली सात दिली. ज्योत्सनीलने 96 धावांची खेळी केली. मात्र, तो धावबाद झाला.

विष्णू (Vishnu Solanki) भुवनेश्वरमध्ये या सामन्यासाठी दाखल झालेला असतानाच त्याला त्याच्या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूसंदर्भातील माहिती फोनवरून मिळाली. अवघ्या एक दिवसाच्या चिमुकलीचा 12 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला बायो बबलबाहेर जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर हैदराबादमार्गे विष्णू बडोद्याला आला. त्याने आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार केले.

त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी तो पुन्हा मनावर दुःखाचा दगड ठेवून संघासाठी भुवनेश्वरला परतला. नियोजित क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून तो मुलीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनंतर लगेच मैदानात खेळण्यासाठी उतरला आणि त्याने शतक ठोकले; पण संघाचा उपकर्णधार असणार्‍या विष्णूने शतकानंतर सेलिब्रेशन केले नाही.

SCROLL FOR NEXT