स्पोर्ट्स

Virender Sehwag Criticize BCCI : सेहवागने अजित आगरकरला फटकारले, 514 धावा करणाऱ्या खेळाडूला टीम इंडियात न घेतल्याने संतापला

श्रेयस अय्यरला इंग्लंड दौऱ्यातून बाहेर ठेवल्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने बीसीसीआयच्या निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रणजित गायकवाड

sehwag questions over shreyas iyer's absence in team India's test squad

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. शुभमन गिल संघाचे नेतृत्व करत आहे. साई सुदर्शन आणि अर्शदीप सिंग या युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. 8 वर्षांनंतर करुण नायरचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

तथापि, चांगली कामगिरी करूनही इंग्लंडविरुद्धच्या टीम इंडियामध्ये एका खेळाडूची निवड झालेली नाही, त्याबद्दल अनेक चाहते संतापले आहेत. या मुद्द्यावरून अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही नाराजी व्यक्त केली आहे.

श्रेयस अय्यरला इंग्लंड दौऱ्यातून बाहेर ठेवल्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने बीसीसीआयच्या निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अय्यरच्या कसोटी संघातील अनुपस्थितीबद्दल ‘क्रिकबझ’शी बोलताना तो म्हणाला की, ‘ऋषभ पंतला कर्णधारपद मिळाले नाही कारण त्याचा आयपीएल हंगाम चांगला गेला नाही. पण अय्यरने यंदाच्या स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. तो पंजाबचा कर्णधार देखील आहे. त्याच्या नेतृत्वाखली तिस-या संघाने प्लेऑफ गाठण्याची किमया केली आहे. असे असले तरी त्याला त्याच्या कर्णधारपदाचे फारसे श्रेय मिळत नाही. अय्यर कसोटी क्रिकेट का खेळू शकत नाही? तो निश्चितच तिन्ही फॉरमॅट खेळू शकतो,’ असे मत व्यक्त केले.

सेहवाग पुढे म्हणाला, ‘इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरची भारतीय संघात निवड व्हावी अशी इच्छा होती. तो आयपीएलच्या 18 व्या हंगामातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांपैकी एक आहे. या हंगामात त्याने 14 सामन्यांमध्ये 514 धावा केल्या आहेत. 2014 नंतर पंजाब किंग्ज संघ पहिल्यांदाच प्लेऑफच्या टॉप 2मध्ये पोहोचला आहे. ही कामगिरी अय्यरच्या नेतृत्वाखालीच घडली.’

‘जे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असतात तेव्हा त्यांना दौऱ्यावर घेणे कधीच फायद्याचे ठरते. कारण त्यांच्याकडून चांगली कामगिरी होण्याची शक्यता जास्त असते. जर संघात असे 2-3 खेळाडू असतील तर ते विरोधी संघात भीती निर्माण करू शकतात. इंग्लंडच संघ षटकामागे 6-7 धावा काढण्यात पटाईत आहे. पण जर भारतीय संघ षटकामागे 4-5 धावा काढू शकला तर नक्कीच यजमान इंग्लिश संघावर दबाव आणता येईल,’ असाही सल्ला सेहवाग दिला.

श्रेयस अय्यरचे कसोटी रेकॉर्ड

अय्यरने 2021 मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. दरम्यान, त्याने आतापर्यंत एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 1 शतक आणि 5 अर्धशतके आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT