Virender Sehwag advice to sons : "यश म्हणजे केवळ संपत्ती, चैनीच्या वस्तू किंवा प्रतिष्ठा मिळवणे नव्हे. जमिनीवर पाय घट्ट रोवून ठेवणे आणि स्वतःच्या कष्टाने आयुष्य घडवणे हे भौतिक सुखांपेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचे आहे," असा बहुमूल्य सल्ला कोणी आध्यात्मिक गुरुंनी नव्हे तर भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग यांनी आपल्या आर्यवीर आणि वेदांत या दोन मुलांना दिला आहे.
'द लाइफ सेवर्स शो'मध्ये बोलताना सेहवाग म्हणाले, माझी दोन्ही मुले आर्यवीर आणि वेदांत ही आता क्रिकेट खेळू लागली आहेत. एक 'अंडर-16' गटात तर दुसरा 'अंडर-19' गटात खेळतो. ती २ ते ३ लाख रुपये कमावत आहेत. एका मुलाने कारमध्ये पेट्रोल भरले, तेव्हा त्याचे बिल ७,००० रुपये आले. ही रक्कम पाहून तो थक्क झाला. मात्र मी जेव्हा मुलांना खर्चासाठी पैसे देत होतो तेव्हा त्यांना त्याचे मूल्य माहीत नव्हते. मात्र जेव्हा मुलाला स्वतःला पेट्रोलसाठी पैसे द्यावे लागले, तेव्हा त्याला समजले की, दैनंदिन खर्चासाठी किती पैसे लागतात.
सेहवाग म्हणाले, किशोरावस्थेतील मुले ही स्वाभाविकपणे भौतिक गोष्टींकडे आकर्षित होतात. त्यांच्या आवडीनिवडी भौतिकवादी असतात. आपण बीएमडब्ल्यू किंवा रेंज रोव्हर सारख्या गाड्यांमधून फिरत आहोत, अशी कल्पना करतात. माझा मुलगा माझी घड्याळे घालण्याची मागणी करतो. ती अजून लहान आहेत. स्वाभाविकपणे भौतिक गोष्टींकडे आकर्षित होतात; मात्र जशी मोठी होतील आणि त्यांना जीवनाची अधिक चांगली समज येईल, त्यांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत जाईल, असेही सेहवाग यांनी नमूद केले.
मुलांना महागड्या गोष्टी हव्या असण्यात काहीच अडचण नाही, खरी अडचण तेव्हा येते जेव्हा मूल मोठेपणी केवळ दिखाव्यालाच 'यश' मानू लागते. त्यामुळेच माझे मुलांना सांगणे आहे की, "फक्त दिखाव्याचे जीवन जगू नका. असे काहीतरी करून दाखवा की, लोक कौतुक करतील."
कोणतीही महागडी कार किंवा घड्याळ, स्वतःच्या कष्टाने काहीतरी अर्थपूर्ण साध्य केल्यावर मिळणाऱ्या समाधानाची बरोबर करू शकत नाही. पालकांच्या संपत्तीवर किंवा पैशांवर अवलंबून राहण्याऐवजी मुलांनी स्वतःच्या कष्टाने आणि गुणी स्वभावाने आपली स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षाही सेहवाग यांनी व्यक्त केली.
मुलांना लहानपणापासूनच मी वास्तव्य काय आहे, याची जाणीव करून देत आहे. त्यांना समजावून सांगितले आहे की, लोक प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना त्यांच्या कामगिरीची तुलना माझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीशी करतील. तुम्हाला टीकेचा सामना करावा लागेल, पण त्याच वेळी तुम्हाला खूप जास्त कौतुकही मिळेल, कारण अनेक लोकांना तुमचे वडील आवडतात, याचे भान ठेवून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे, असा सल्लाही सेहवागने आपल्या मुलांना दिला.