Sunil Gavaskar on India vs West Indies 2nd T20I : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात २४९ धावा करूनही भारताला सामना जिंकता आला नाही. शाई होप याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद शतक झळकावत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. या सामन्यातील भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ५०० हून अधिक धावा निघणे ही तशी दुर्मिळ बाब आहे; पण शुक्रवारी रांचीत काहीसा असाच थरार पाहायला मिळाला. संजू सॅमसनच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने २० षटकांत ५ विकेट गमावत तब्बल २४९ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र शाई होपच्या धमाकेदार फलंदाजीने वेस्ट इंडिज संघाने भारताचे २४९ धावांचे विक्रमी लक्ष्य अवघ्या १८.३ षटकांत ९ चेंडू राखून पार केले. या सामन्यातील पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी गोलंदाजांच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
सुनील गावस्कर यांनी 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना सांगितले की, "मला वाटले होते की, काही षटके धावांची गती मंदावल्यानंतर भारत २३५-२४० पर्यंत मजल मारेल; पण भारताने त्याहून नऊ धावा जास्त केल्या. त्यामुळे फलंदाजांना दोष देता येणार नाही. त्यांनी कमी धावा केल्या असे अजिबात म्हणता येणार नाही.
स्पष्टपणे सांगायचे तर, भारतीय गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे मारा केला नाही. गोलंदाजी प्रशिक्षकाने या गोलंदाजांकडून काय अपेक्षा ठेवली होती आणि त्यांनी त्यानुसार कामगिरी केली का, हे विचारणे रंजक ठरेल," असे खडे बोल सुनील गावस्कर यांनी सुनावले.
सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, तुम्ही याला कोणतीही निश्चित धावसंख्या देऊ शकत नाही. कारण जेव्हा दव फॅक्टर येतो, तेव्हा त्याचा खेळावर मोठा प्रभाव पडतो. २४९ धावांचे लक्ष्यसुद्धा दोन षटके शिल्लक असताना गाठले गेले. त्यामुळे आपण इतक्या धावा करू, असा अंदाज किंवा आकडा निश्चित करणे अशक्य आहे."
पुरुष T20I सामन्यांमधील सर्वाधिक एकूण धावा (सामन्यातील दोन्ही संघांच्या एकत्रित धावा)
५१७ - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, २००९
५०१ - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, रांची, २०२६
४९९ - भारत विरुद्ध इंग्लंड, मुंबई, T20 विश्वचषक २०२६ उपांत्य सामना
४९६ - भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम, २०२६
४८९ - वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, लॉडरहिल, २०१६