virat kohli should be honoured with the bharat ratna
‘टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली 2008 पासून भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग बनला. त्याने स्वतःच्या बळावर टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. 36 वर्षीय या खेळाडूला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. भारतीय क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल कोहलीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे,’ अशी मागणी माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने केली आहे.
भारतीय क्रीडा इतिहासात आतापर्यंत फक्त एकाच खेळाडूला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. तो एकमेव खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. फेब्रुवारी 2014 मध्ये, तत्कालीन केंद्र सरकारच्या शिफारशीवरून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सचिनला भारतरत्न प्रदान केला. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला हा सन्मान मिळालेला नाही.
सुरेश रैनाने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमादरम्यान म्हटले की, विराट कोहलीने भारतीय क्रिकेटसाठी जे काही साध्य केले आहे त्यासाठी त्याला भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे. भारत सरकारने याचा विचार करावा. रैनाच्या या विधानानंतर सोशल मीडियावर कोहली हा भारतीय क्रीडा इतिहासातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारा दुसरा खेळाडू बनू शकतो का? याबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
रैनाने बीसीसीआयला कोहलीशी बोलून त्याच्यासाठी दिल्लीत निवृत्तीचा सामना आयोजित करण्याची विनंती केली आहे. तो म्हणाला, ‘मला असेही वाटते की विराट कोहलीने दिल्लीत निवृत्तीचा सामना खेळायला हवा. त्याच्या कुटुंबाला, तसेच प्रशिक्षकांनासह चाहत्यांना आपल्या लाडक्या खेळाडूला तिथे पाठिंबा देण्याची संधी मिळेल. त्याने टीम इंडियासाठी अतुलनीय अशी कामगिरी केली आहे, त्यामुळे या महान खेळाडूशी संवाद साधून निरोपाच्या सामन्याबाबत चर्चा करावी.’
विराट कोहलीने नुकताच कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीच्या पाच दिवसांनंतर, त्यानेही क्रिकेटच्या या दिर्घ फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. कोहलीने 123 कसोटी सामन्यांमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतकांसह 46.85 च्या स्ट्राईक रेटने 9230 धावा केल्या आहेत. त्याने गेल्या वर्षी टी-20 विश्वषचक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल.
36 वर्षीय कोहलीने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या नावावर अनेक ऐतिहासिक विक्रमांची नोंद झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये नवीन उंची गाठली आणि केवळ एकदिवसीयच नव्हे तर टी-20 मध्येही चमकदार कामगिरी केली. आता कोहलीचे डोळे आयपीएल 2025 मध्ये जेतेपद जिंकण्यावर आहे. त्याचा संघ आरसीबी प्लेऑफचे तिकीट मिळवण्याच्या अगदी जवळ आहे. या हंगामात संघाला प्रथमच विजेतेपद जिंकण्याची उत्तम संधी आहे.