सराव सत्रादरम्यान कोहलीने एका युवा नेट बॉलरला असे काही खास गिफ्ट दिले
झारखंडचा युवा वेगवान गोलंदाज ऋत्विक पाठकने केला व्हिडिओ शेअर
अलिबागमध्ये सराव करून घेणाऱ्या सर्व नेट बॉलर्ससोबत फोटोही काढले
virat kohli special gift to net bowler
मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आगामी 'विजय हजारे ट्रॉफी'साठी जोरदार तयारी करत आहे. अलिबाग येथे सुरू असलेल्या सराव सत्रादरम्यान कोहलीने एका युवा नेट बॉलरला असे काही खास गिफ्ट दिले.
आयफोनवर दिली स्वाक्षरी झारखंडचा युवा वेगवान गोलंदाज ऋत्विक पाठक याने या सराव सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विराट कोहली ऋत्विकच्या चक्क 'आयफोन'च्या मागील बाजूवर ऑटोग्राफ देताना दिसत आहे. ऋत्विकने या अविस्मरणीय क्षणाचा व्हिडिओ आपल्या फोनच्या मागील कॅमेऱ्याने रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "फोन कदाचित नेहमी राहणार नाही, पण हा व्हिडिओ मात्र कायम राहील." त्याच्या या ओळींना नेटीझन्सची मोठी पसंती मिळत आहे.
कोहलीने केवळ ऑटोग्राफच दिला नाही, तर अलिबागमध्ये सराव करून घेणाऱ्या सर्व नेट बॉलर्ससोबत वेळ काढून फोटोही काढले. ऋत्विकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "विराट कोहलीसमोर तीन दिवस सलग वेगवान गोलंदाजी करणे हा माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत खास अनुभव होता. मला मिळालेल्या या संधीबद्दल मी मनापासून ऋणी आहे."
विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळणार विराट कोहलीची २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत ५० षटकांच्या 'विजय हजारे ट्रॉफी'साठी दिल्लीच्या संघात निवड झाली आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (बेंगळुरू) येथे कोहली दिल्लीसाठी किमान दोन सामने खेळण्याची शक्यता आहे. मात्र, तो नेमके कोणते सामने खेळणार, याबाबत अद्याप दिल्ली क्रिकेट असोसिएशनने (DDCA) स्पष्टीकरण दिलेले नाही. वरिष्ठ खेळाडूंना दोन सामने खेळणे बंधनकारक विजय हजारे ट्रॉफीची साखळी फेरी २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यंदा केंद्रीय करारबद्ध असलेल्या सर्व वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देण्यासाठी किमान दोन सामने खेळण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचीही मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका ११ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, हे वरिष्ठ खेळाडू विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीत (नॉकआउट) सहभागी होऊ शकणार नाहीत.