अन्य खेळाडूंची चाचणी बंगळूरमध्ये, विराटला मात्र विशेष सवलत
केवळ वन डेमध्येच खेळत असल्याने विराटला मुभा मिळाल्याची शक्यता चर्चेत
दुसर्या चाचणीत दुखापतीतून सावरत असलेल्या खेळाडूंचा समावेश
या महिन्यात होणारदुसर्या टप्प्यातील चाचणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स, बंगळूर येथे भारतीय क्रिकेटपटूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर सर्व खेळाडूंनी चाचणीसाठी बेंगळूर गाठले असताना विराट कोहलीची चाचणी मात्र लंडनमध्ये झाली असून यामुळे विराट कोहलीला ‘स्पेशल ट्रिटमेंट’ का, यावरून वादंग निर्माण झाले आहे.
एका वृत्तानुसार, वन डे कर्णधार रोहित शर्मा, कसोटी कर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दिग्गज खेळाडूंनी 29 ऑगस्ट रोजी फिटनेस चाचणी दिली. मात्र, सध्या कुटुंबासह लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या कोहलीला बंगळूरला जाण्यापासून सूट देण्यात आली. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या व केवळ वन डे सामने खेळणार्या कोहलीने लंडनमध्येच फिटनेस सिद्ध करण्यासाठी आधीच परवानगी घेतली असावी, असा अंदाजही या वृत्तात व्यक्त करण्यात आला आहे.
फिटनेस चाचणीच्या पहिल्या टप्प्यात रोहित, गिल, बुमराह, हार्दिक पंड्या, सिराज, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शमी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा यांच्यासह आणखी काही खेळाडूंची चाचणी बंगळूरमध्ये झाली. या पहिल्या टप्प्यात खेळाडूंची तंदुरुस्ती तपासली गेली. बहुतांश खेळाडूंनी ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
जे खेळाडू पुनर्वसन प्रक्रियेत आहेत किंवा दुखापतीतून सावरत आहेत, त्यांची चाचणी दुसर्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात घेतली जाईल. या यादीत ऋषभ पंत, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, आकाश दीप, नितीश रेड्डी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. संघाच्या फिजिओने या चाचणीचा अहवाल बीसीसीआयला पाठवला आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमधील पाच सामन्यांची कसोटी मालिका संपन्न झाल्यानंतर भारतीय खेळाडू एक महिन्याच्या विश्रांतीवर होते. आता आशिया चषकाद्वारे भारतीय टी-20 संघ पुन्हा मैदानात उतरणार आहे. 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे सुरू होणार्या या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळणार आहे. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत रोहित शर्मासोबत कोहलीही मैदानात परतण्याची शक्यता आहे.