

सोलापूर : सोलापुरातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असूनही, त्यांना योग्य सुविधा, प्रशिक्षण आणि पाठिंब्याचा अभाव जाणवतोय. राजकीय दुर्लक्ष आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सोलापूरची क्रीडा संस्कृती मागे पडली आहे. योग्य मैदाने, प्रशिक्षित मार्गदर्शक, राजकीय पाठिंबा याची सोलापुरातील खेळाडूंना सध्या गरज जाणवत आहे.
सोलापुरातील क्रीडा क्षेत्र नावाजलेले आहे. सोलापूरने अनेक नामवंत खेळाडू राज्याला आणि देशाला दिले. राज्याचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार घेतलेल्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे. क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबडड्डी यासारख्या सांघिक खेळाबरोबरच टेनिस, अॅथलेटिक, कराटे, जलतरण, ड्रायव्हिंग यासारख्या इतर वैयक्तिक खेळांमध्ये सोलापुरातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. परंतु सोलापुरातील अपुर्या सुविधा, राजकीय अनास्था यामुळे खेळाडूंना म्हणावी तशी संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. फुटबॉल, हॉकीसारख्या खेळांना स्वतंत्र मैदाना नाही, दोन इनडोअर स्टेडीअम आहेत परंतु त्यांची दुरावस्था झाली आहे. अॅथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅकची मागणाी गेल्या पंधरा वर्षांपासून केली होती; परंतु आता त्याचे काम सुरू आहे. ते कामही दर्जेदार होण्याची गरज आहे.
इतर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कायम पुढे असल्याचे दिसते; परंतु सोलापुरातील राजकीय नेत्यांचे क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. सोलापुरातील क्रीडा क्षेत्राला भरारी घ्यायची असल्यास प्रथम पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. खासदार, आमदार आणि स्थानिक नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खेळाडू आणि प्रशिक्षकांची आहे.
सोलापुरातील खेळाडूंना पाठिंब्याची गरज
सोलापुरात अनेक गरीब घरातील खेळाडू देशपातळीवर चमकत आहेत. परंतु परिस्थिीमुळे त्यांना पुढे जाता येत नाही. अशा खेळाडूंना राजकीय व्यक्ती, उद्योगपती यांनी आर्थिक मदत करण्याची गरज आहे. उदयोन्मुख खेळाडूंना पाठिंबा मिळाला तर ते सोलापूरचे नाव देशपातळीवर नेतील. सोलापुरात चाळीसहून अधिक साखर कारखाने आहेत त्यांनीही अशा गुणवंत खेळाडूंचे प्रायोजकत्व घेण्याची गरज आहे.