Virat Kohli One8 Commune Closure: बेंगळुरूमधील चर्चेत असलेले ‘वन8 कम्यून’ (One8 Commune) रेस्टॉरंट अखेर बंद करण्यात आले आहे. सिव्हिल कोर्टाच्या आदेशानंतर या रेस्टॉरंटवर कुलूप लावण्यात आले. रेस्टॉरंटकडून तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक भाडे आणि इतर देणी थकित असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे विराट कोहली. माहितीप्रमाणे, कोहलीने या रेस्टॉरंटपासून स्वतःला पूर्णपणे वेगळे केले आहे. त्याने केवळ भागीदारीच संपवली नाही, तर ‘One8’ हा स्वतःचा ब्रँडही या आउटलेटमधून काढून घेतला आहे.
हे रेस्टॉरंट ‘ट्रायो हिल्स हॉस्पिटॅलिटी’ या कंपनीमार्फत चालवले जात होते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून भाडे न भरल्याने तसेच मेंटेनन्स चार्ज आणि रेव्हेन्यू शेअर थकवल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने इमारतीच्या मालकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि अखेरीस कोर्टाने रेस्टॉरंट बंद करण्याचा आदेश दिला.
विशेष म्हणजे, या आउटलेटवर यापूर्वीही नियमभंगाचे आरोप झाले होते. अग्निसुरक्षा आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महानगरपालिकेकडून अनेकदा नोटिसा देण्यात आल्या होत्या. या सततच्या वादांमुळे आणि नकारात्मक प्रतिमेमुळे कोहलीने या आउटलेटपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
दरम्यान, ब्रँडची प्रतिमा घसरल्याने ग्राहकसंख्या कमी झाली आणि व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. परिणामी, आर्थिक अडचणी वाढत गेल्या. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार, सर्व थकीत रक्कम भरली जात नाही तोपर्यंत हे रेस्टॉरंट बंदच राहणार आहे.
‘वन8 कम्यून’ ही One8 ब्रँडअंतर्गत सुरू करण्यात आलेली प्रीमियम रेस्टॉरंट चेन आहे. दिल्ली, गुरुग्राम, पुणे, कोलकाता, नोएडा, बेंगळुरू आणि हैदराबाद अशा अनेक शहरांमध्ये हा ब्रँड आहे. चांगलं वातावरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खाद्यपदार्थ आणि खास डायनिंग अनुभवासाठी हा ब्रँड ओळखला जातो.