पुढारी ऑनलाईन डेस्क : आयएएस अधिकारी जितिन यादव यांनी विराट कोहली याची दहावीची मार्कशीट दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर शेअर केली होती. आपल्या 'X' आकाऊंटवर मार्कशीट शेअर करताना त्यांनी 'जर गुणच सगळं काही असते, तर आज संपूर्ण देश त्याच्या मागे उभा राहिला नसता. खरं तर जिद्द आणि समर्पण हाच यशाचा खरा मंत्र आहे.' असे कॅप्शन लिहिले होते. त्यांची ही पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर विराटच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने १२ मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतली होती. दरम्यान रोहित शर्मा पाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत होण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले होते. यादरम्यानच १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. यामुळे आयएएस अधिकारी जितीन यादव यांनी आपल्या 'X' आकाऊंटवर शेअर केलेली विराटची दहावीची मार्कशीट पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली.
विराटची ही मार्कशीट २००४ ची असून त्याला दहावीला ६०० पैकी ४१९ गुण मिळाले आहेत. त्याने इंग्रजी (८३), सामाजिक शास्त्र (८१) आणि हिंदी (७५) यामध्ये चांगले गुण मिळवले आहेत, तर गणित (५१), माहिती आणि तंत्रज्ञान (५५) आणि परिचयात्मक आयटी (७४) मध्ये सरासरी गुण मिळविले आहेत. विराटचे शैक्षणिक गुण सामान्य असले, तरी त्याच्या मेहनतीने आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेमुळे तो आज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान ठरला आहे. त्यामुळे परिक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यानी ठरवावं की, यश मिळविण्यासाठी गुण किती महत्त्वाचे आहेत.