

Virat Kohli Test Retirement : विराट कोहलीने सोमवारी (दि. १२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर आज तो पत्नी अनुष्का शर्मा हिच्यास कुंज आश्रमात प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला भेट दिली.
आज सकाळी सहाच्या सुमारास विराट पत्नी अनुष्कासह प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी मथुरेच्या वृंदावन येथील कुंज आश्रमात पोहोचला. विराट कोहलीचा हा तिसरा दौरा आहे. चार महिन्यांपूर्वी १० जानेवारी २०२५ रोजी प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली होती.विराट आणि अनुष्का हे प्रेमानंद महाराज यांना भेटण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी, ते ४ जानेवारी २०२३ रोजी पहिल्यांदा संत प्रेमानंदांना भेटले होते. त्यानंतर ते या वर्षी १० जानेवारी रोजी पुन्हा आले होते. आज सकाळी विराट सहाच्या सुमारास वृंदावनमधील कुंज आश्रमाला पोहोचला. नंतर नऊ-साडेनऊ वाजता तिथून तो निघाला. यानंतर त्याने बाराह घाटाजवळ राहणाऱ्या संत प्रेमानंदांच्या गुरू गौरांगी शरण यांचेही भेट घेतली. येथे पाच मिनिटे थांबून तो रवाना झाला.
प्रेमानंद महाराज यांच्याबरोबरील मागील भेटीत विराटने विचारलं होतं की, अपयशावर मात कशी करावी. सतत सराव करावा आणि संयमाने वाटचाल, असे प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिले होते. नित्त जप करणे ही माझ्यासाठी साधना आहे, तशीच क्रिकेट तुमच्यासाठी साधना आहे, असेही प्रेमानंद महाराज यांनी विराटला सांगितले होते. देवाच्या ज्ञानासोबतच त्याच्या नावाचा जप करणे देखील आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी विराटला दिला होता.
प्रेमानंद महाराज यांना प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज म्हणूनही ओळखले जाते. वृंदावनमधील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे जन्मनाव अनिरुद्ध कुमार पांडे असून, त्यांचा जन्म ३० मार्च १९६९ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सरसौल गावात झाला. कुटुंबात आध्यात्मिक वातावरण असल्याने त्यांना लहानपणापासूनच भक्ति आणि साधनेची आवड लागली. वयाच्या १३व्या वर्षीच त्यांनी घर सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रारंभिक काळात वाराणसीतील गंगाकाठी साधना केली. त्यानंतर, वृंदावनमध्ये राधावल्लभ संप्रदायाचे गुरु श्री हित गौरंगी शरण जी महाराज यांच्याकडून 'निज मंत्र' घेऊन 'सहचारी भाव' आणि 'नित्य विहार रास' यांचा अभ्यास सुरू केला. या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे ते रासिक संतांच्या परंपरेत समाविष्ट झाले. सध्या त्यांचे वास्तव्य वृंदावनमधील 'श्री हित राधा केली कुंज' या आश्रमात आहे. वर्षानुवर्षे कडनीच्या समस्येशी झुंज देऊनही ते त्यांच्या भक्तांसाठी आणि श्रद्धाळूंसाठी दररोज आश्रमात येतात. त्यांचे प्रवचन आणि भजन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.