स्पोर्ट्स

Vijay Hazare Trophy : ९ षटकार, १८ चौकार... रोहित शर्माचे विक्रमी शतक! सिक्कीमच्या गोलंदाजीचा उडवला धुव्वा(Video)

Rohit Sharma : 'लिस्ट-ए' कारकिर्दीतील ३७ वे शतक, ९४ चेंडूंत १५५ धावांची तडाखेबंद खेळी; निवडकर्त्यांना सडेतोड उत्तर

रणजित गायकवाड

जयपूर : भारतीय फलंदाजीचा कणा असलेल्या रोहित शर्माने विजय हजारे करंडक स्पर्धेत दिमाखदार पुनरागमन केले आहे. सिक्कीमविरुद्ध खेळताना रोहितने अवघ्या ६२ चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारली, जे त्याच्या 'लिस्ट-ए' कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रेक्षकांच्या अलोट गर्दीसमोर रोहितने मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आपल्या तुफानी फलंदाजीने आणि तंदुरुस्तीने त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

विक्रमी खेळीचा झंझावात

जगातील पहिल्या क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज असलेल्या रोहित शर्माने बुधवारी सिक्कीमच्या गोलंदाजांना मैदानावर चोहोबाजूंनी पळवले. केवळ ६२ चेंडूंत शतक पूर्ण करणाऱ्या रोहितने आपल्या खेळीत ८ षटकार आणि ९ चौकार लगावले. हे त्याच्या 'लिस्ट-ए' कारकिर्दीतील ३७ वे शतक ठरले. शतक पूर्ण केल्यानंतरही त्याचा झंझावात थांबला नाही; त्याने ९४ चेंडूंत १५५ धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीत एकूण ९ षटकार आणि १८ चौकारांचा समावेश होता. रोहितच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने १९.३ षटके राखून ८ गड्यांनी विजय मिळवला.

सिक्कीमने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे मुंबईने ३१ व्या षटकातच सहज गाठले. रोहितने २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूंत केलेल्या एकदिवसीय शतकाचा स्वतःचाच विक्रम आज मोडीत काढला. २००८ मधील पदार्पणानंतर मुंबईसाठी त्याने झळकावलेले हे पहिलेच शतक आहे. तसेच २०१९ नंतर सहा वर्षांनी त्याने दीडशे धावांचा टप्पा ओलांडण्याची किमया साधली.

स्टेडियममध्ये 'रोहित... रोहित'चा जयघोष

२०१८ नंतर रोहित पहिल्यांदाच विजय हजारे करंडकात खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याला पाहण्यासाठी १२,००० हून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. सामना पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असल्याने दिवसभर गर्दी वाढतच गेली. रोहित क्षेत्ररक्षण करत असताना संपूर्ण स्टेडियम 'मुंबईचा राजा' आणि 'रोहित... रोहित'च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. प्रेक्षकांकडून ‘रोहितला गोलंदाजी द्या’ अशी मागणीही सातत्याने होत होती.

मैदानात चौफेर फटकेबाजी

रोहितने आपल्या खेळीची सुरुवात त्याच्या खास शैलीतील ‘पुल शॉट’ने केली. सिक्कीमच्या अननुभवी गोलंदाजीवर त्याने पूर्ण वर्चस्व गाजवले. क्रीझचा वापर करत त्याने अनेकदा पुढे येऊन चेंडू सीमापार धाडले. त्याने मारलेला एक 'स्वीप शॉट' थेट स्टेडियमच्या बाहेर गेला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचे शतक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी झाडांवर आणि स्टेडियमजवळील इमारतींच्या छतावरही गर्दी केली होती.

जयपुरात रोहितची 'हिटमॅन' खेळी : मैदानात चौफेर फटकेबाजी

रोहितने आपल्या खेळीची सुरुवात त्याच्या खास शैलीतील ‘पुल शॉट’ने केली. सिक्कीमच्या अननुभवी गोलंदाजीवर त्याने पूर्ण वर्चस्व गाजवले. क्रीझचा वापर करत त्याने अनेकदा पुढे येऊन चेंडू सीमापार धाडले. त्याने मारलेला एक 'स्वीप शॉट' थेट स्टेडियमच्या बाहेर गेला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचे शतक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी झाडांवर आणि स्टेडियमजवळील इमारतींच्या छतावरही गर्दी केली होती.

टीकाकारांना बॅटने दिले उत्तर

चार महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या रोहितने ६ सामन्यांत ३४८ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, विजय हजारे टॉफीतील पहिल्याच सामन्यामधील या मॅरेथॉन खेळीने त्याने आपली लय आणि फिटनेस पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

दिग्गजांचे शानदार पुनरागमन

भारतीय क्रिकेटचे दोन आधारस्तंभ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच आपल्या बॅटची जादू दाखवली आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत या दिग्गज जोडीने शतके झळकावत बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि 'एकदिवसीय' फॉरमॅटमधील वर्चस्वाची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

२०२५/२६ च्या विजय हजारे करंडकाच्या पहिल्या दिवशी फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. बुधवारी आपापल्या संघांकडून खेळताना रोहित आणि विराटने या स्पर्धेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. रोहितने १५५ धावांची झंझावाती खेळी केली, तर विराटने (१३१) संयमी शतक झळकावत २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण अजूनही प्रबळ दावेदार असल्याचे संकेत दिले.

बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य केल्यानंतर या दोघांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असताना केवळ नियमांचे पालन न करता, आपला सराव आणि लय कायम राखण्याचा या खेळाडूंचा मानस स्पष्टपणे दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT