नवी दिल्ली : विजय हजारे चषक स्पर्धेतील पहिल्या फेरीत बुधवारचा दिवस दिग्गज, अनुभवी, युवा खेळाडूंच्या धुवाँधार शतकांनी गाजवला. दिवसभरात झालेल्या 19 सामन्यांत ओडिशाच्या स्वस्तिक समलने शानदार द्विशतक झळकावले तर एकूण 21 जणांनी तडफदार शतके फटकावली. एकीकडे, वैभव सूर्यवंशीने अवघ्या 59 चेंडूंत दीडशे धावा टोलवल्या तर दुसरीकडे, विराट कोहलीने आंध्रविरुद्ध 131 धावा जमवताना लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16 हजार धावांचा टप्पा पार केला. जयपूरमध्ये सिक्कीमविरुद्ध रोहित शर्मानेही 155 धावांची तोडफोड खेळी साकारत दिवसातील आणखी एक शतक झळकावले.
स्नेहल कवठणकर (गोवा), शुभम खजुरिया (जम्मू-काश्मीर), विष्णू विनोद (केरळ), इशान किशन (झारखंड), देवदत्त पडिक्कल (कर्नाटक), यश दुबे (मध्य प्रदेश), वैभव सूर्यवंशी, आयुष, सकिबूल गनी (बिहार), रिकी भुई (आंध्र), विराट कोहली (दिल्ली), अमन मोखडे, ध्रुव शोरे (विदर्भ), स्वस्तिक समल, बिपलब समंत्राय (ओडिशा), सम्मर गज्जर (सौराष्ट्र), हिमांशू राणा (हरियाणा), रवी सिंग (रेल्वे), फेरोईजम जोतिन (मणिपूर), अर्पित भटेवरा, किशन लिंगडोह (मेघालय).
बिहार 6/574 विजयी वि. अरुणाचल 177
आंध्र प्रदेश 8/298 पराभूत वि. दिल्ली 6/300
तामिळनाडू 7/310 विजयी वि. पुद्दुचेरी 209
मध्य प्रदेश 5/287 विजयी वि. राजस्थान 188
झारखंड 9/412 पराभूत वि. कर्नाटक 5/413
केरळ 8/348 विजयी वि. त्रिपुरा 203
चंदीगड 208 पराभूत वि. जम्मू-काश्मीर 0/209
आसाम 282 पराभूत वि. बडोदा 5/283
उत्तर प्रदेश 5/324 विजयी वि. हैदराबाद 240
विदर्भ 5/382 पराभूत वि. बंगाल 7/383
सिक्कीम 7/236 पराभूत वि. मुंबई 2/237
हिमाचल प्रदेश 259 विजयी वि. उत्तराखंड 164
छत्तीसगड 233 पराभूत वि. गोवा 4/234
पंजाब 6/347 विजयी वि. महाराष्ट्र 8/296
ओडिशा 6/345 पराभूत वि. सौराष्ट्र 5/347
हरियाणा 9/267 पराभूत वि. रेल्वे 4/270
सेनादल 184 पराभूत वि. गुजरात 2/185
नागालँड 236 पराभूत वि. मणिपूर 9/241
मेघालय 291 विजयी वि. मिझोराम 212
वैभव सूर्यवंशीने अवघ्या 84 चेंडूंत 16 चौकार, 15 षटकारांसह 190 धावांची आतषबाजी केल्यानंतर बिहारने विजय हजारे करंडक (2025-26) प्लेट लीग स्पर्धेत अरुणाचल प्रदेशचा निर्धारित 50 षटकांत 6 बाद 574 धावांचा डोंगर उभारत ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. बिहारने हा सामना चक्क 397 धावांच्या एकतर्फी फरकाने जिंकला. अरुणाचलचा डाव अवघ्या 177 धावांत आटोपला.
बिहारच्या या ऐतिहासिक विजयाचा पाया 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने रचला. वैभवने अवघ्या 36 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे वरिष्ठ स्तरावरील (टी-20 वगळता) पहिलेच शतक ठरले. त्याने अवघ्या 59 चेंडूंत 150 धावांचा टप्पा पार करून दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा (64 चेंडू, विंडीजविरुद्ध , 2015) विक्रम मोडीत काढला.
वैभवच्या विक्रमानंतर काही वेळातच बिहारचा कर्णधार साकिबूल गनीने अवघ्या 32 चेंडूंत शतक झळकावत अनमोलप्रीत सिंगचा (35 चेंडू) विक्रम मोडीत काढला. गनीने अवघ्या 40 चेंडूंत 10 चौकार आणि 12 षटकारांसह 128 धावा कुटल्या. यष्टिरक्षक-फलंदाज आयुष लोहारुकानेही 56 चेंडूंत 116 धावांचे योगदान दिले, तर पीयूष सिंगने 66 चेंडूंत 77 धावांची खेळी केली. अरुणाचल प्रदेशचे मिबोम मोसू (0/116), सूर्यांश सिंग (0/98), तडाकामल्ला मोहित (2/99), धीरज अंतीन (1/81) आणि तेची नेरी (2/83) हे सर्वच गोलंदाज महागडे ठरले.
भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ विराट कोहलीने बुधवारी ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमध्ये सर्वात जलद 16,000 धावा पूर्ण करण्याचा बहुमान पटकावला असून, त्याने आपल्या 330 व्या डावात हा पल्ला गाठला. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने येथे मागे टाकला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 391 डावांमध्ये हा टप्पा सर केला होता. 37 वर्षीय कोहलीने बंगळूर येथील ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ मैदानावर सुरू असलेल्या विजय हजारे करंडकात दिल्लीकडून खेळताना आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली.
विशेष म्हणजे, 10,000 धावांपासून ते 16,000 धावांपर्यंतच्या प्रत्येक हजार धावांच्या टप्प्यावर सर्वात जलद पोहोचण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. सुमारे 15 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर कोहली देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे करंडकात खेळत आहे. या प्रतिष्ठित वन डे स्पर्धेत कोहलीने 13 सामन्यांत 68.25 च्या सरासरीने आणि 106 च्या स्ट्राईक रेटने 819 धावा केल्या असून, यात 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेला कोहली आता केवळ वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या घरच्या मैदानातील वन डे मालिकेत तो पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने कर्नाटकविरुद्ध झारखंडकडून खेळताना अवघ्या 33 चेंडूंत शतक ठोकून खळबळ उडवून दिली. किशनचे हे वादळी शतक ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमध्ये भारतीयाने केलेले दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले. गेल्याच आठवड्यात झारखंडला सय्यद मुश्ताक अली करंडकाचे पहिले जेतेपद मिळवून देणाऱ्या किशनला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहेे. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने 517 धावा केल्या होत्या. हरियाणाविरुद्ध अंतिम सामन्यातील शतकही निर्णायक ठरले होते.
कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात किशनने केवळ 39 चेंडूंत 7 चौकार, 14 षटकारांच्या मदतीने नाबाद 125 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट 320.51 इतका जबरदस्त होता. कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. झारखंडची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर उत्कर्ष सिंग (8) आणि शुभ शर्मा (15) लवकर बाद झाले. शिखर मोहनने 44 धावांची संयमी खेळी केली. त्यानंतर विराट सिंग आणि कुमार कुशाग्रा यांनी चौथ्या विकेटसाठी 129 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. कुशाग्रा 63 धावांवर बाद झाला, तर विराटने 68 चेंडूंत 88 धावांचे योगदान दिले. शेवटी, इशान किशनने दिलेल्या फिनिशिंग टचमुळे झारखंडने आपल्या 50 षटकांत 9 बाद 412 धावांचा विशाल स्कोअर उभारला.
कर्णधार रोहित शर्माच्या 155 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील या सामन्यात मुंबईने सिक्कीमचा 8 गडी राखून सहज पराभव केला.
सिक्कीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकांत 7 बाद 236 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. सिक्कीमकडून यष्टिक्षक-फलंदाज आशिष थापाने सर्वाधिक 79 धावांची झुंजार खेळी करत डावाला आकार दिला. प्रत्युत्तरात रोहित शर्माने अवघ्या 94 चेंडूंत 18 चौकार व 9 उत्तुंग षटकारांसह 155 धावांची आतषबाजी केली. रोहितने आपली आक्रमक लय कायम राखत 62 चेंडूंत शतक पूर्ण केले. हे त्याच्या ‘लिस्ट-ए’ कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. रोहितच्या या प्रहारापुढे सिक्कीमच्या गोलंदाजांचा निभाव लागला नाही. मुंबईने विजयाचे लक्ष्य केवळ 30.3 षटकांत पूर्ण करत 8 गडी राखून मोठा विजय नोंदवला.