भारतातील युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सातत्याने विक्रमांना गवसणी घालत आहे.  
स्पोर्ट्स

Vaibhav Suryavanshi IPL 2026 Record |वैभव सूर्यवंशीचा नवा धमाका; ५१४ चेंडूत प्रस्थापित केला नवा विक्रम !

Vaibhav Suryavanshi IPL 2026 Record | अभिषेक शर्मालाही टाकले पिछाडीवर

पुढारी वृत्तसेवा

Vaibhav Suryavanshi IPL 2026 Record

भारतातील युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सातत्याने विक्रमांना गवसणी घालत आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या १५ वर्षीय फलंदाजाने शनिवारी (दि. ९ मे) अनोख्या जागतिक विक्रमाची नोंद केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभवने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला. याच षटकारासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १०० षटकार पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. वैभवने हा टप्पा अवघ्या ५१४ चेंडूत गाठला, जो आतापर्यंत कोणत्याही फलंदाजासाठीचा सर्वात वेगवान आकडा आहे.

अभिषेक शर्माला टाकले मागे

या कामगिरीसह वैभवने भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मालाही मागे टाकले आहे. इतक्या लहान वयात असा विक्रम करणे, हे त्याच्यातील टॅलेंट आणि निर्भय फलंदाजीचे मोठे प्रतीक मानले जात आहे.

IPL इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

वैभव यापूर्वीच आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत आणि आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३६ चेंडूत शतके ठोकली होती.

पॉवरप्लेचा नवा 'सिक्सर किंग'

गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने अवघ्या १६ चेंडूत ३६ धावा केल्या. त्याच्या खेळीत तीन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याचे तिन्ही षटकार पॉवरप्लेमध्ये आले. यासह वैभव आता आयपीएलच्या एका मोसमात पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.

वैभवची कामगिरी सर्वांनाच चकित करणारी

वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने एकामागून एक विक्रम रचत आहे, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की भारतीय क्रिकेटला एक नवा सुपरस्टार मिळाला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी त्याचा आत्मविश्वास, पॉवर हिटिंग आणि मोठ्या व्यासपीठावरील त्याची कामगिरी सर्वांनाच चकित करत आहे.

गुजरात टायटन्सची विशाल धावसंख्या

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत २२९/४ अशी मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार शुभमन गिलने ४४ चेंडूत ८४ धावा, साई सुदर्शनने ३६ चेंडूत ५५ धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने २० चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. गुजरातच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत शेवटच्या षटकात २१ धावा वसूल केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव १६.३ षटकांत १५२ धावांवरच आटोपला. वैभव व्यतिरिक्त रवींद्र जडेजाने ३८ धावांचे योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT