८४ चेंडूंत १९० धावा
१६ चौकार, १५ षटकार
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये (देशांतर्गत पातळीवरील मर्यादित षटकांचा सामना) सर्वात वेगवान १५० धावा (५९ चेंडू)
लिस्ट-ए मध्ये शतक झळकावणारा ठरला सर्वात तरुण खेळाडू
Vaibhav Suryavanshi Record
नवी दिल्ली : भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत क्रिकेट विश्वात नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारकडून खेळताना त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा १० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १५० धावा करण्याचा मान आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना रंगला. बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानात उतरल्यापासूनच वैभवने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने अवघ्या ३६ चेंडूंत आपले शतक पूर्ण करून खळबळ उडवून दिली. यानंतरही तो थांबला नाही आणि त्याने द्विशतकाच्या दिशेने कूच केली.
वैभव सूर्यवंशीने या खेळीदरम्यान केवळ ५९ चेंडूंत आपले १५० रन पूर्ण केले. या खेळीने त्याने एबी डिव्हिलियर्सचा ६४ चेंडूंत १५० धावांचा (२०१५ विरुद्ध वेस्ट इंडिज) विक्रम मोडीत काढला आहे. इतकेच नव्हे तर इंग्लंडच्या जोस बटलरचा ६५ चेंडूंतील १५० धावांचा विक्रमही आता मागे पडला आहे. वैभवने ८४ चेंडूंत १९० धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये १५ षटकार आणि १६ चौकारांचा समावेश होता. त्याचे द्विशतक अवघ्या १० धावांनी हुकले.
वैभवने वयाचाही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी (१४ वर्षे २७२ दिवस) लिस्ट-ए क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८६ मध्ये जहूर इलाही यांनी १५ वर्षे २०९ दिवस वयात हा पराक्रम केला होता.