Vaibhav Suryavanshi  Pudhari
स्पोर्ट्स

Vaibhav Sooryavanshi : दुलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची निराशाजनक सुरुवात; अवघ्या ६ चेंडूंत तंबूत परतला

पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्‍या कामगिरीकडे सर्वांचे वेधले होते लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Vaibhav Suryavanshi Duleep Trophy debut

दुलीप ट्रॉफी २०२६-२७ च्या पहिल्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) सामन्यात ईस्ट झोन आणि नॉर्थ-ईस्ट झोन आमनेसामने आले आहेत. बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात सर्वांच्या नजरा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीची सुरुवात मात्र अत्यंत निराशाजनक झाली. नॉर्थ-ईस्ट झोनविरुद्ध खेळताना तो ६ चेंडूंत ८ धावा करून बाद झाला. या आठ धावा त्याने दोन चौकारांच्या मदतीने केल्या. बिश्वोरजीत सिंह कोंथौजामने त्याला जोसेफ लाल थानखुमाकरवी झेलबाद केले.

वैभव सूर्यवंशीची प्रथम श्रेणी कामगिरी

ईस्ट झोनने वैभवकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. अतिरिक्त जबाबदारीचा दबाव तो कसा हाताळतो, हे पाहण्यासाठी निवड समितीने हा निर्णय घेतला. वैभवने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यांच्या १३ डावांमध्ये १७ च्या सरासरीने २१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावले आहे.

टी-२० मधील धडाकेबाज कामगिरी

वैभवने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत 'प्लेअर ऑफ द सीरिज'चा किताब पटकावला होता. हा पुरस्कार जिंकणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने ३ सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने १५१ धावा केल्‍या होत्या. याआधी आयपीएल २०२६ च्या हंगामातही त्याने ७७६ धावांचा डोंगर उभारला होता.

दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चे स्वरूप

दुलीप ट्रॉफीचे पहिले दोन सामने क्वार्टर फायनल असतील. पहिला सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ-ईस्ट झोन यांच्यात, तर दुसरा सामना नॉर्थ झोन आणि वेस्ट झोनमध्ये सुरू आहे.या दोन उपांत्यपूर्व सामन्यांतील विजेते संघ थेट सेमीफायनलमध्ये सेंट्रल झोन आणि साऊथ झोनशी भिडतील. मागील वर्षाचे अंतिम विजेते-उपविजेते असल्याने सेंट्रल झोन आणि साऊथ झोनला 'बाय' (Bye) मिळाला असून ते थेट उपांत्य फेरीत खेळतील. पहिल्या सेमीफायनलमध्ये सेंट्रल झोनचा सामना पहिल्या क्वार्टर फायनलच्या विजेत्याशी होईल, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये साऊथ झोन दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या विजेत्या संघाशी लढत देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT