Travis Head Instagram Post Pudhari
स्पोर्ट्स

Travis Head Post: विराट कोहली सोबतच्या वादानंतर ट्रेविस हेडची गूढ पोस्ट; नेमकं काय लिहिलं? सोशल मीडियावर ड्रामा

Travis Head Instagram Post: SRH विरुद्ध RCB सामन्यानंतर विराट कोहलीने ट्रेविस हेडसोबत हस्तांदोलन न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Travis Head Instagram Post: आयपीएल 2026 मधील हैदराबाद विरुद्ध बेंगळुरू सामना संपल्यानंतर मैदानावरील तणावाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात सामन्यादरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर आता ट्रेविस हेडच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने चाहत्यांमध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात हैदराबादने 55 धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्यातील वादाची.

हँडशेकवरून सुरू झाली चर्चा

सामना संपल्यानंतर खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. यावेळी ट्रेविस हेडने विराट कोहलीकडे हात पुढे केल्याचे दिसले. मात्र, विराटने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे, त्यानंतर विराटने इतर हैदराबाद खेळाडूंशी, अगदी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सोबत हस्तांदोलन केल्याने या प्रकाराची अधिक चर्चा रंगली.

मैदानात नेमकं काय घडलं?

सामन्यादरम्यान विराट आणि हेड यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे दिसले होते. आरसीबीचा डाव सुरू असताना हेडने विराटला मोठे फटके मारण्याचे आव्हान दिल्यासारखे काही इशारे केल्याची चर्चा आहे. त्यावर विराटने, “आता तुम्ही सबस्टिट्यूट होणार नाही, मग गोलंदाजी तरी करा,” अशा शैलीत प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, विराट कोहली केवळ 11 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर ट्रेविस हेडने त्याला काही टोमणासदृश टिप्पणी केल्याचाही दावा केला जात आहे, ज्यामुळे दोघांमधील तणाव आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

ट्रेविस हेडची इंस्टाग्राम स्टोरी

सामना संपल्यानंतर ट्रेविस हेडने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. त्यावर त्यांनी “Keep the body guessing” असे लिहिले होते. ही पोस्ट विराट कोहलीसोबतच्या नो-हँडशेक वादाला उद्देशून होती का, असा सवाल आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

हेडने या पोस्टचा थेट संदर्भ दिलेला नसल्याने त्यामागचा नेमका अर्थ स्पष्ट झालेला नाही. पण सोशल मीडियावर चाहत्यांनी याचा संबंध विराटसोबतच्या वादाशी जोडत विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT