ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू म्हटले की, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना स्लेजिंग अर्थात टोमणे मारणे आलेच. खेळात विशेषतः क्रिकेटमध्ये स्लेजिंग ( प्रतिस्पर्धी खेळाडूंना मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्यासाठी किंवा त्याचा एकाग्रता भंग करण्यासाठी मारलेले टोमणे किंवा उपहासात्मक टिप्पणी) केले जाते. प्रतिस्पर्धी संघ चांगली कामगिरी करत असेल तर याचा वापर होतो. ऑस्ट्रेलिया संघ यासाठी आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार टेन्बा बवुमा (Temba bavuma )याने धक्कादायक खुलासा करताना म्हटलं आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम फेरीदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांचा आत्मविश्वास ढळावा यासाठी "चोक" हा शब्द वापरत स्लेजिंग केलं.
लॉर्ड्स मैदानावर सामन्याच्या चौथ्या दिवशी जेव्हा दक्षिण आफ्रिका विजयाच्या जवळ पोहोचत होती, तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी 'चोक' (दडपणाखाली अपयशी ठरणे) हा शब्द वापरला. टेंबा बावुमा आणि एडेन मार्कराम यांची भागीदारी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. याबाबत 'बीबीसी'शी बोलताना बवुमा म्हणाला की, लॉर्ड्स मैदानावर झालेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बवुमा व त्याच्या संघाला मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्यासाठी "चोक" (ऐन मोक्याच्या क्षणी कचखाणे) हा वादग्रस्त शब्द वापरला होता. आम्ही फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी 'चोक' हा शब्द उच्चारत असल्याचं ऐकायला मिळालं. मात्र आम्ही आत्मविश्वासाने मैदानात उतरलो, असेही त्याने स्पष्ट केले.
अनेक जण आमच्या मार्गावर प्रश्न उपस्थित करत होते, पण आम्ही अंतिम फेरी गाठली. हा विजय त्या सर्व शंका-कुशंकांना उत्तर देणारा आहे. आज आपल्यासारख्या विभागलेल्याचं देशासाठी एकत्र येण्याची ही संधी आहे. आपल्या देशवासीयांना काही काळासाठी का होईना आनंद मिळावा. देश एकत्र यावा, हीच इच्छा आहे. या विजयातून प्रेरणा मिळावी, हे आम्ही आशा करतो. या संघाकडे अनेकांनी शंका घेतली होती, पण आमच्या खेळाने त्या सर्व शंका बाजूला केल्या."
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज यानेही "चोकर्स" (दबावाखाली कोसळणारा संघ) या जुन्या टॅगवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "आता पुन्हा तो शब्द ऐकावा लागणार नाही, ही गोष्ट खूप मोठी आहे. आम्ही काम पूर्ण केलं आणि त्या टॅगपासून सुटका मिळवली. याआधी अनेक प्रश्न विचारले गेले, पण आता त्यांची उत्तरं आम्ही दिली आहेत." दरम्यान, WTC फायनलमध्ये केवळ खेळच नाही तर मानसिक दबाव आणि रणनीतींनीही मोठी भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंगने दक्षिण आफ्रिकेला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या दबावाचा सामना केला आणि शानदार विजय मिळवत दक्षिण आफ्रिका संघाने आपल्यावर चोकर्स हा शिक्का हटवला.