पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लड यांच्यामध्ये सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 ( IND VS ENG 1st T20)मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने 12.5 षटकांत (77 चेंडूत)133 धावांचे लक्ष्य गाठले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 130 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा हा सर्वात कमी षटकांत विजय आहे. या बाबतीत टीम इंडियाने चार वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
याआधी 130 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टी-20 मध्ये सर्वात कमी षटकांचा पाठलाग करण्याचा भारताचा विक्रम 15.2 षटकांचा होता. भारताने 2021 मध्ये नामिबियाविरुद्ध हे केले होते. त्याचवेळी 2024 मध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध 15.2 षटकांत 130+ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. इंग्लंडविरुद्धच्या कोलकाता टी-20 मध्ये भारताने हे सर्व विक्रम मागे टाकले. अभिषेक शर्माच्या वादळी खेळी आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला.
इंग्लंडने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनीही विशेष कामगिरी केली आहे. अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर 97 विकेट्स आहेत. अर्शदीपने या सामन्यात 2 बळी घेतल्यानंतर चहलचा विक्रम मोडला. चहलच्या नावावर सध्या 96 विकेट्स आहेत. या सामन्यात 2 विकेट घेत हार्दिकने यादीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता त्याच्या नावावर 91 विकेट्स झाल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमार नावावर 90 विकेट्स आहेत. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने तीन, तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. यामुळे इंग्लंड संघाला 132 धावा करता आल्या. इंग्लिश संघाकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 68 धावा केल्या.
इंग्लडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीमुळे भारताने विजय मिळवला. अभिषेकने 20 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे भारतीय भूमीवर टी-२० मध्ये भारतासाठी संयुक्त तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. अभिषेकने 34 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने 36 धावा केल्या. तिलक वर्मा 19 धावांवर आणि हार्दिक पंड्या 3 धावांवर नाबाद राहिले. पुढील टी-20 सामना 25 जानेवारी रोजी चेन्नई येथे खेळला जाणार आहे.