IND vs ENG 3rd Test Rishabh Pant injury
भारत- इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्सवर १० जुलै रोजी सुरु झाला. दरम्यान, खेळाच्या पहिल्या दिवशीच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना दुखापत झाली. ही दोन्ही संघांसाठी चिंतेची बाब आहे.
ऋषभ पंतने या कसोटी मालिकेत स्फोटक फलंदाजी केली आहे. चार डावांत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा लेग साइडला गेलेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना पंतला दुखापत झाली. चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला लागला.
फिल्ड फिजिओने ऋषभ पंतची तात्काळ तपासणी केली. ही दुखापतीची घटना ३४ व्या षटकांच्या दुसऱ्या चेंडूवर घडली. सुरुवातीला असे वाटले की त्याची दुखापत किरकोळ आहे. त्याने उपचारानंतर यष्टिरक्षणदेखील सुरू केले. पण त्याला त्रास जाणू लागला. त्यानंतर पंतने ३४ व्या षटकांचा खेळ संपल्यानंतर मैदान सोडले. यानंतर, ध्रुव जुरेलने त्याची जागा घेत यष्टिरक्षण केले. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. पण तो बदली खेळाडू म्हणून मैदानात आला.
बीसीसीआयकडून X वर ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे. ''टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर मेडिकल टीमच्या निरिक्षणाखाली उपचार सुरू आहेत. ऋषभच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल यष्टिरक्षण सांभाळेल.''
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला फलंदाजी करताना मांडीच्या सांध्याला दुखापत झाली. यामुळे त्याला धाव घेताना त्रास जाणवला. इंग्लंड संघ स्टोक्सच्या फिटनेसबाबत आशावादी आहे. जो रूट, ओली पोप आणि बेन स्टोक्सच्या संयमी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामान्यातील पहिल्या दिवसाअखेर ८३ षटकांत ४ बाद २५१ धावांपर्यंत मजल मारली. स्टोक्स १०२ चेंडूत ३ चौकांरासह ३९ धावांवर नाबाद राहिला.