IND vs ENG Test | पंत, स्टोक्सची ड्यूक्स चेंडूवर नाराजी कशामुळे?

दोन्ही संघांचा ठपका... चेंडू लवकर मऊ होतो, सतत बदलावा लागतो
IND vs ENG 3rd Test
IND vs ENG Test | पंत, स्टोक्सची ड्यूक्स चेंडूवर नाराजी कशामुळे?Pudhari File Photo
Published on
Updated on

लीडस् आणि बर्मिंगहॅम कसोटींत दोन्ही संघांनी वारंवार चेंडू बदलण्यासाठी पंचांकडे धाव घेतल्याचे दिसले, हे चित्र आता लॉर्डस् कसोटीपूर्वी चर्चेचा विषय ठरले आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत यांनी लॉर्डस् कसोटीपूर्वी ड्यूक्स चेंडू लवकर मऊ होतो, त्याचा आकार बिघडतो यावर खुलेपणाने नाराजी व्यक्त केली आहे. स्टोक्सने तर वापरल्या जाणार्‍या बॉल गेजवरच शंका उपस्थित केली आहे.

जेव्हा जेव्हा परदेशी संघ इंग्लंडमध्ये येतात, तेव्हा चेंडू मऊ होणे आणि पूर्णपणे आकार बदलणे हे नेहमीचेच झाले आहे, असे स्टोक्स म्हणाला. मला तर वाटते आपण जे रिंग्ज वापरतो, त्या ड्यूक्स कंपनीच्या अधिकृतही नाहीत. हे निश्चितच आदर्श नाही; पण आपल्याला त्याचा सामना करावा लागतो.

गेजची प्रक्रिया काय असते?

दोन रिंग्ज असलेली ही गेज पंचांकडून वापरली जाते. चेंडूने एका रिंगमधून जाऊ शकले पाहिजे; पण दुसर्‍या लहान रिंगमधून नाही. जर चेंडू या निकषांवर उतरला नाही, तर तो बदलण्यायोग्य मानला जातो. मात्र, अनेकदा चेंडू मऊ होऊनसुद्धा पंच चेंडू बदलण्यास नकार देतात, यामुळे गोलंदाज निराश होतात.

ऋषभ पंतचा संताप आणि ‘आयसीसी’चा दंड

यापूर्वी लीडस् कसोटीच्या दुसर्‍या दिवशी, पंतने पंचांनी चेंडू बदलण्यास नकार दिल्यानंतर चेंडू जमिनीवर फेकला. त्याला ‘आयसीसी’ने एक डिमेरीट पॉईंट देत अधिकृत तंबी दिली. स्टोक्सच्या मतावर प्रतिक्रिया देताना पंतने थोडक्याच विनोदी शैलीत म्हटले, मी त्याच गेजचा वापर करीन; पण रिंग्ज थोड्या लहान असतील! मात्र त्याने पुढे स्पष्ट सांगितले, ही समस्या खूप मोठी आहे. कारण, चेंडू वारंवार आकार बदलतो. मी अशा प्रकारे चेंडू लवकर खराब होताना पाहिले नव्हते; पण एकंदरीत क्रिकेटसाठी हे चांगले नाही.

स्टोक्सचेही स्पष्ट मत

जर तुम्हाला वाटत असेल की, चेंडूचा आकार गेला आहे, तर पंचांकडे जाऊन तपासून पाहा. जर चेंडू रिंग्जमधून गेला, तर खेळ सुरू ठेवा; पण एक वेळ अशी येते की, तो इतका वाईट प्रकारे आकार सोडतो की, शेवटी तुम्हाला चेंडू बदलायला मिळतो. गेल्या आठवड्यात एजबॅस्टनमध्ये ही समस्या फारच मोठी होती. या दोन्ही खेळाडूंच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, या मालिकेतील ड्यूक्स चेंडूंची गुणवत्ता आणि टिकाव यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरवेळी चेंडूचा प्रभाव बदलत असल्याने सामना असंतुलित होतो आणि याचा परिणाम संपूर्ण खेळावर होतो.

ड्यूक्स कंपनीचे म्हणणे काय आहे?

ड्यूक्स चेंडूचे निर्माते दिलीप जगजोडिया यांच्या मते, खेळात मोठे बदल झाल्यामुळे आता नियमांमध्येही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यांचा युक्तिवाद आहे की, चेंडू कालांतराने मऊ होणे अपेक्षित असते. परंतु, आता बॅटस् अधिक शक्तिशाली झाल्या आहेत, फटक्यांचे टायमिंग सुधारले आहे. यात चेंडू सातत्याने बॅटवर जोरात आदळत असल्याने चेंडू मऊ पडण्याचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. प्रत्येकजण चेंडूलाच दोष देतो. जेव्हा फलंदाज शून्यावर बाद होतात, तेव्हा खेळपट्टी जबाबदार असते. जेव्हा गोलंदाजांना बळी मिळत नाहीत, तेव्हा चेंडूला दोष दिला जातो. चेंडूची झीज होणे स्वाभाविक आहे; तो काही दगड नाही. कदाचित, खेळाच्या प्रशासकांनी 60 व्या ते 70 व्या षटकादरम्यान नवीन चेंडू घेण्याची परवानगी देण्यावर विचार करायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news