team india schedule matches against pakistan australia south africa
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा नुकताच संपन्न झाला आहे. या दौऱ्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यजमान इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली, जी २-२ अशा बरोबरीत सुटली. इंग्लंड संघाने लीड्स आणि लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर भारतीय संघाने एजबॅस्टन आणि ओव्हल येथील कसोटी सामन्यात विजयश्री खेचून आणली. मँचेस्टर येथील कसोटी सामना अनिर्णित राहिला.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय खेळाडूंना काही दिवसांची विश्रांती मिळाली आहे. आता भारतीय संघापुढील आव्हान सप्टेंबरमध्ये नियोजित असलेली आशिया चषक स्पर्धा हे आहे. आशिया चषक २०२५ चे सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबू धाबी आणि दुबई या दोन शहरांमध्ये खेळवले जातील. या स्पर्धेत भारताला पाकिस्तान, यजमान यूएई आणि ओमान या संघासोबत 'अ' गटामध्ये स्थान देण्यात आले आहे.
आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध होईल. त्यानंतर भारतीय संघ दुबईत १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी दोन हात करेल. भारताचा अखेरचा साखळी सामना १९ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे ओमानविरुद्ध होईल. भारतीय संघाची सुपर-फोर फेरीत पोहोचण्याची दाट शक्यता असून, तिथे संघाला तीन सामने खेळावे लागतील. स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवला जाईल.
आशिया चषक स्पर्धेनंतर लगेचच वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येईल, जिथे दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तर दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल.
पहिली कसोटी : २ ते ६ ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरी कसोटी : १० ते १४ ऑक्टोबर, नवी दिल्ली
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर काही दिवसांच्या अंतरानेच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल. या दौऱ्याच्या सुरुवातीला तीन एकदिवसीय सामने खेळले जातील, ज्या मालिकेला १९ ऑक्टोबरपासून प्रारंभ होईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मैदानात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
पहिला एकदिवसीय सामना: १९ ऑक्टोबर, पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरा एकदिवसीय सामना: २३ ऑक्टोबर, ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
तिसरा एकदिवसीय सामना: २५ ऑक्टोबर, सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG), सिडनी
पहिला टी-२० सामना: २९ ऑक्टोबर, मानुका ओव्हल, कॅनबेरा
दुसरा टी-२० सामना: ३१ ऑक्टोबर, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG), मेलबर्न
तिसरा टी-२० सामना: २ नोव्हेंबर, बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट
चौथा टी-२० सामना: ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट स्टेडियम, गोल्ड कोस्ट
पाचवा टी-२० सामना: ८ नोव्हेंबर, द गॅबा, ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून आणि दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून खेळला जाईल. त्यानंतर एकदिवसीय मालिकेला ३० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर टी-२० मालिकेला ९ डिसेंबर रोजी सुरुवात होईल. मालिकेतील अखेरचा सामना १९ डिसेंबर रोजी खेळवला जाईल, जो २०२५ या वर्षातील भारतीय संघाचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल.
पहिली कसोटी: १४ ते १८ नोव्हेंबर, कोलकाता
दुसरी कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर, गुवाहाटी
पहिला एकदिवसीय सामना: ३० नोव्हेंबर, रांची
दुसरा एकदिवसीय सामना: ३ डिसेंबर, रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना: ६ डिसेंबर, विशाखापट्टणम
पहिला टी-२० सामना: ९ डिसेंबर, कटक
दुसरा टी-२० सामना: ११ डिसेंबर, मुल्लानपूर
तिसरा टी-२० सामना: १४ डिसेंबर, धर्मशाला
चौथा टी-२० सामना: १७ डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी-२० सामना: १९ डिसेंबर, अहमदाबाद